उन्हाने बिघडले आरोग्य, ५० टक्के रुग्ण गॅस्ट्रोचे; लहान मुलांचे सर्वाधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:35 IST2025-03-17T12:33:51+5:302025-03-17T12:35:02+5:30

जुलाब, उलटी, ताप आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे.

Health deteriorated due to heat, 50 percent of patients suffered from gastroenteritis; highest incidence in children | उन्हाने बिघडले आरोग्य, ५० टक्के रुग्ण गॅस्ट्रोचे; लहान मुलांचे सर्वाधिक प्रमाण

उन्हाने बिघडले आरोग्य, ५० टक्के रुग्ण गॅस्ट्रोचे; लहान मुलांचे सर्वाधिक प्रमाण

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा तडाखा वाढत असतानाच शहरात गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयांतील ओपीडीत येणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ५० टक्के रुग्ण गॅस्ट्रोच्या तक्रारी घेऊन येत आहेत. विशेषत: यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. जुलाब, उलटी, ताप आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे.

वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते, ज्यामुळे पचनसंस्था कमजोर होते आणि गॅस्ट्रोसारखे संसर्गजन्य आजार वाढतात. यंदा मार्चच्या १५ दिवसांतच तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. या सगळ्यात गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

गॅस्ट्रो का वाढत आहे?
– उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.
– उघड्यावरचे आणि बिनसुरक्षित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो होण्याचा धोका वाढतो.
– उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, अन्नपदार्थ सेवन केल्याने गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव वाढतो.
– रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रूप धारण करतो.

लक्षणे...
- सतत जुलाब आणि उलटी
- ताप आणि अशक्तपणा
- भूक न लागणे आणि पोटदुखी
- पाणी कमी झाल्यामुळे तोंड कोरडे पडणे

ही घ्या काळजी
- उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरावे.
- उघड्यावरचे अन्नपदार्थ, शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- जेवणाच्या आधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुणे गरजेचे.
- घरगुती पदार्थ खावे. हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा.
- डिहायड्रेशन टाळावे. लिंबूपाणी, ताक आणि इलेक्ट्रोलाइट्स घेत राहावे.

साथ सुरू
ओपीडीत सध्या ५० टक्के रुग्ण हे गॅस्ट्रोचे आहेत. डिहायट्रेशन होणार नाही, याची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- डाॅ. प्रशांत चव्हाण, बालरोगतज्ज्ञ

रुग्णांमध्ये वाढ
सध्या गॅस्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. बाहेरगावी जाऊन येणारे आजारी पडत असल्याची स्थिती आहे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डाॅ. मंदार देशपांडे, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Health deteriorated due to heat, 50 percent of patients suffered from gastroenteritis; highest incidence in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.