घराघरांतून लोखंडी कढई-तवा ‘हद्दपार’; ॲनिमिया होण्याचा धोकाही वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:38 IST2026-02-13T19:37:50+5:302026-02-13T19:38:10+5:30

आरोग्यासाठी साखरेपेक्षा 'लोह' महत्त्वाचे; नॉनस्टिकचा मोह पडतोय महागात.

Health Alert: Disappearance of Iron Utensils Leading to Severe Anemia in Women; Shocking Data from Ghati Hospital | घराघरांतून लोखंडी कढई-तवा ‘हद्दपार’; ॲनिमिया होण्याचा धोकाही वाढतोय!

घराघरांतून लोखंडी कढई-तवा ‘हद्दपार’; ॲनिमिया होण्याचा धोकाही वाढतोय!

छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी घराघरांत हमखास दिसणारी लोखंडी कढई, लोखंडी तवा अनेक स्वयंपाकघरांतून जवळपास हद्दपार झाली आहेत. त्याजागी नॉनस्टिक, स्टीलच्या भांड्यांचा वापर वाढला. मात्र यामुळे अन्नातून मिळणाऱ्या नैसर्गिक लोहाचा स्रोत कमी झाला असून, पंडुरोगाचा (ॲनिमिया) धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ‘लोखंडी कढई-तवा पुन्हा स्वयंपाकघरात आणा…कारण हे फक्त भांडे नाही, आरोग्याची गरज आहे!’ असा संदेश तज्ज्ञांनी दिला.

दरवर्षी १३ फेब्रुवारीला जागतिक ॲनिमिया दिन साजरा केला जातो. शरीरात रक्ताभिसरण करणाऱ्या हिमोग्लोबिनमध्ये घट झाल्यास ‘ॲनिमिया’ हा आजार उद्भवतो. पौष्टिक आहाराचा अभाव, मासिक पाळीतील रक्तस्त्राव आणि गर्भधारणेदरम्यान शरीराला वाढलेली लोहाची गरज पूर्ण न झाल्यास हा आजार बळावतो. ग्रामीण भागात ही समस्या गंभीर आहे.

३ हजार ५८१ गरोदर मातांना ॲनिमिया
घाटीत २०२५ मध्ये उच्च जोखीम प्रसूतींमध्ये ॲनिमियाची तब्बल ३ हजार ५८१ प्रकरणे नोंदविण्यात आली. अक्षरश: ०.५ ‘एचबी’ असलेल्या महिलाही घाटीत येत असल्याची चिंता डाॅक्टरांनी व्यक्त केली.

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ मोहिमेतील आकडेवारी
जिल्हा - गर्भवती महिला- मध्यम ॲनिमिया (एचबी ७.१-१०.९) - टक्केवारी - गंभीर ॲनिमिया (एचबी ७ पेक्षा कमी) - टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर - ३४,३०६ - २९,३३७ - ८६ टक्के - १,७४८ - ५ टक्के

ॲनिमियाचे कारण?
शरीरात लोह, व्हिटॅमिन बी-१२ आणि फॉलिक ॲसिड या पोषक तत्त्वांची कमतरता, चुकीच्या आहारपद्धती, जंक फूडचे सेवन आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात अभाव यामुळे ही समस्या उद्भवते. थकवा, हलकी चक्कर, बारीक ताप, श्वास घेण्यास त्रास, त्वचा फिकट पडणे, केस गळणे, ही ॲनिमियाची लक्षणे आहेत.

मनाने टाॅनिक नको
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय दुकानातून कोणतेही आयर्न टाॅनिक आणू नये. आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा. स्वयंपाकासाठी लोखंडी कढई किंवा तवा वापरल्याने अन्नामध्ये नैसर्गिकरीत्या लोहाचे प्रमाण वाढते.
- डाॅ. श्रुती तोष्णीवाल, रक्तविकारतज्ज्ञ

महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
‘एचबी’ हे ११ पेक्षा कमी नसावे. त्यापेक्षा ‘एचबी’ कमी असेल तर ॲनिमिया असतो. ‘एचबी’ ५ ते ७ पर्यंत घसरलेल्या महिलांची घाटीत प्रसूती होते. इतके ‘एचबी’ कमी होईपर्यंत महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. आहारात लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

लोखंडी कढई-तव्याचा फायदा
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लोखंडी कढई-तव्याचा वापर करावा. त्यातून नैसर्गिकरीत्या लोह मिळून हिमोग्लोबिन वाढते. ॲनिमियामुक्त भारत योजनेंतर्गत आयर्न आणि फाॅलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात.
- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक

Web Title : लोहे के बर्तन गायब, एनीमिया का खतरा बढ़ रहा: विशेषज्ञों का आग्रह!

Web Summary : लोहे के बर्तनों का उपयोग घटने से एनीमिया का खतरा बढ़ रहा है। विशेषज्ञ लोहे के बर्तन इस्तेमाल करने की सलाह देते हैं, ताकि प्राकृतिक रूप से आयरन की मात्रा बढ़े और कमी दूर हो सके, खासकर महिलाओं के लिए।

Web Title : Iron Pans Vanishing, Anemia Risk Rising: Experts Urge Return!

Web Summary : The decline in iron pan usage increases anemia risk. Experts recommend using iron cookware to boost iron intake naturally, preventing deficiency and promoting health, especially for women.