मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 18:46 IST2024-09-10T18:45:54+5:302024-09-10T18:46:37+5:30
म्हाडा कॉलनीमधील खदानीत बुडून मुलाचा मृत्यू

मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : नवीन बीड बायपास मार्गाजवळील एका खदानीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनीत मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. मुराद नजमोद्दीन सय्यद (वय १२, ह.मु. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर, मूळ गाव नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. १० वर्षीय मुलाच्या मृत्यूची वार्ता पसरताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हा मुलगा दोन मित्रांसोबत घराजवळील खदानीत पोहण्यासाठी गेला होता. परंतु, त्याला पोहत येत नसल्याने तो खदानीमधील पाण्यात बुडाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खदानीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागला नाही. अखेर अग्नीशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी शोध घेवून दुपारी दीड वाजता त्याचा मृतदेह खदानीबाहेर काढला. मृत मुलाच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.