समोर जाऊन कार अडवली अन् डोकं आदळलं; समृद्धी महामार्गावर डॉक्टकडून लुटले १५ तोळे सोने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:07 IST2025-05-05T17:06:27+5:302025-05-05T17:07:00+5:30
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटमार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

समोर जाऊन कार अडवली अन् डोकं आदळलं; समृद्धी महामार्गावर डॉक्टकडून लुटले १५ तोळे सोने
Samruddhi Mahamarg: मेहकरला नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होऊन पालघरच्या दिशेने जाणाऱ्या डॉक्टर कुटुंबाची कार अडवून समृद्धी महामार्गावर चार लुटारूंनी मारहाण करत लुटले. गाडीतील महिलांच्या अंगावरील १५ तोळे सोन्यासह मोबाइलदेखील लंपास केला. २ मे रोजी रात्री १० वाजता अवघ्या ५ मिनिटांत ही लुटमारीची घटना घडली.
डॉ. श्रावण शिंगणे व त्यांच्या पत्नी चैताली, असे दोघे पालघर येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. २९ एप्रिलला ते भावाच्या लग्नासाठी मेहकरला गेले होते. समारंभ आटोपून २ रोजी सायंकाळी श्रावण, पत्नी चैताली, मुलगा श्रीराज व आई मीना निंभोरे कारने समृद्धी महामार्गावरून परत निघाले. रात्री १० वाजता करमाड पोलिस ठाण्याची हद्द संपताच शेंद्रा परिसरात एका सुसाट कारचालकाने त्यांना ओव्हरटेक करत त्यांच्या कारसमोर कार उभी केली. कारमधून चार जणांनी उतरून विमा कंपनीचे लोक असल्याचे सांगितले. एकाने कारची चावी काढून घेतली. श्रावण यांना मारहाण करून स्टिअरिंगवर डोके आदळले. पत्नी व सासूचे दागिने, मोबाइल हिसकावले.
महिलांना जिवे मारण्याची धमकी
लुटारूंनी श्रावण व त्यांची पत्नी, सासूलाही मारहाण केली. श्रावण यांनी दरोडेखोरांच्या कारला मागून धडक देत अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा श्रावण यांना मारहाण करीत चावी काढली. लुटारू मराठी भाषिक होते. त्यांनी शेंद्रा परिसरात सुरक्षारक्षकालाही मारहाण केली.
लुटमारीचाही धोका
मार्च, २०२३ मध्ये सावंगी बोगद्याजवळ पनवेलच्याच कुटुंबाला मारहाण करीत बंदूक, तलवारीचा धाक दाखवून दागिने आणि रोकड लुटली.
जून, २०२३ मध्ये नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर करजना गावाजवळ मध्यरात्री दरोडेखोरांकडून दगडफेक.
ऑगस्ट, २०२३ मध्ये मेहकरजवळ एका कुटुंबाला अडवून त्यांच्याकडील १ लाख २० हजार, मोबाइल लुटण्यात आला.
मे, २०२४ मध्ये मेहकरजवळ मुंबईकडे प्रवास करणाऱ्या कुटुंबाला दरोडेखोरांनी गळ्यावर शस्त्र ठेवत रकमेसह दागिने लुटले.
जून, २०२४ मध्ये पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या व्यावसायिकावर चाकूहल्ला करून रोख रक्कम, आयफोनसह चार तोळे सोने लुटले.