स्वत:ची सांगून दुसऱ्याचीच अडीच एकर जमीन २.८९ कोटी घेऊन विकली, ८ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:57 IST2025-12-17T13:56:42+5:302025-12-17T13:57:22+5:30
तीन महिलांसह पाच एजंटवर सातारा ठाण्यात गुन्हा; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

स्वत:ची सांगून दुसऱ्याचीच अडीच एकर जमीन २.८९ कोटी घेऊन विकली, ८ जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : सातबाऱ्यावर प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली व पूर्वीच प्लॉटिंग करून विक्री झालेली जमीन स्वत:ची भासवून तीन महिला व पाच एजंटांनी मिळून बीडच्या व्यावसायिकाला विक्री केली. त्याला २ कोटी ८९ लाखांचा गंडा घातला. सोमवारी सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मंजिरी अलोक चौधरी, स्वप्ना विद्याधर बडीगणवार, मोहिनी दिलबागसिंग, जावेदखान नूरखान पठाण, मैत्रेय प्लॉटिंग सेंटरचा भागीदार सुरेश सीताराम इंगळे, बद्रिनारायण नागोराव करे, साहेबराव कचरू घुगे व बाबूराव आनंद ताठे अशी आरोपींची नावे आहेत. मूळ बीडचे असलेले अशोक चांदमल लोढा हे जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक आहेत. २०२३ मध्ये लोढा व त्यांचे भागीदार सय्यद नजीर सय्यद वजीर (रा. बीड) हे शहरात जमिनीच्या शोधात होते. एजंट शेख रईस शेख रसूल (रा. सातारा गाव) यांच्यामार्फत त्यांना सातारा परिसरातील गट क्रमांक २० मधील १०३.५५ आर जमीन विक्री असल्याचे कळाले. त्यानंतर रईसने अन्य आरोपींची ओळख करुन दिली. तेव्हा जावेद पठाण, इंगळे, करे, घुगे, ताठेने सदर जमिनीचे मंजिरि, स्वप्ना व मोहिनी मालक असल्याचे सांगितले. शिवाय, सदर जमिनीबाबत त्यांचा ११ जुलै २०२३ रोजी सामंजस्य करार झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्यात २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता.
पैसे घेईपर्यत बनाव कायम
- २० जुलै २०२३ रोजी इंगळे, करे, घुगे व ताठेने मैत्रेय प्लॉटिंग फर्मच्या वतीने इसार पावती करून दिली. त्यावेळी लोढा यांनी ११ लाख रोख, तर ३९ लाख धनादेशाद्वारे अदा केले. काही दिवसांनी बीडमध्ये १८ लाख रुपये अदा केले.
- १८ एप्रिल २०२४ राेजी आरोपींनी त्यांना १०३.५५ आर क्षेत्राचे खरेदीखत करून दिले. त्यावेळी लोढा यांनी त्यांना १ कोटी ६१ लाख रुपयांचे धनादेश अदा केले. त्याव्यतिरिक्त त्यांचे ३५ लाख रुपये रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्यूटी व २५ हजार रुपये कागदपत्रांसाठी खर्च झाले.
साफसफाई केली अन् फसगत झाल्याचे कळाले
लोढा व त्यांच्या भागिदाराने सर्व व्यवहार झाल्यानंतर १५ लाख रुपये देऊन सदर जमिनीची साफसफाई केली. तारांचे कुंपण टाकून पत्र्याची खोली बांधली. मार्च २०२५ मध्ये राजीव खेडकर यांनी ते सर्व काढून टाकले. लोढा यांनी खेडकर यांची भेट घेतल्यावर त्यांना आपली फसगत झाल्याचे कळाले. तेव्हा मंजिरी, स्वप्ना, मोहिनीकडून खरेदी केलेले क्षेत्र प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे समोर आले. शिवाय, काही जमीन प्लॉटिंगसाठी आधीच विकली असून नियोजनात रस्त्यासाठी सोडलेली शिल्लक जागा स्वत:ची भासवून बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केली. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड अधिक तपास करत आहेत.