चिखलठाणा स्मशानात 'ते' पुरवतात मोफत गोवऱ्या अन सरणासाठीची लाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 18:37 IST2018-04-09T18:36:38+5:302018-04-09T18:37:12+5:30
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या रमेश दहीहंडे यांनी स्वखर्चातून चिकलठाणा येथील दोन स्मशानभूमीत मोफत गोवऱ्या व सरणासाठी लागणारी लाकडे मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

चिखलठाणा स्मशानात 'ते' पुरवतात मोफत गोवऱ्या अन सरणासाठीची लाकडे
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र जगाच्या नकाशावर नावारूपाला आहे. या परिसराचा झपाट्याने विकास झाला असला तरी गावाने आजही ग्रामीण संस्कृतीचा बाज सांभाळलेला आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या रमेश दहीहंडे यांनी स्वखर्चातून चिकलठाणा येथील दोन स्मशानभूमीत मोफत गोवऱ्या व सरणासाठी लागणारी लाकडे मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
रमेश दहीहंडे यांनी वैयक्तिक खर्चाला कात्री लावून खारीचा वाटा म्हणून चौधरी कॉलनी व चिकलठाणा येथील दोन्ही स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या कुटुंबाच्या खांद्यावरचा थोडाफार भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्याच कुटुंबाची परिस्थिती भक्कम असेल असे नाही; परंतु अनेकांना प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरावा लागतो. त्यामुळे सामान्य नागरिकांसह इतरांसाठीदेखील आपण काही तरी देणं लागतो. या विचाराने दहिहंडे यांनी मित्रमंडळासह विचारविनिमय करून दोन्ही स्मशानभूमीत मोफत गोवऱ्या आणि लाकडे देण्याची संकल्पना मांडली. प्रत्येक स्मशानात मनपाने मोफत लाकडे दिली होती. कालांतराने तो उपक्रम बंद पडला. तोच उपक्रम चिकलठाण्यात सुरू आहे.
अमर्याद काळासाठी...
ही योजना नावासाठी नव्हे तर अमर्याद काळासाठी चालू राहणार आहे, तीही मोफतच राहील, असे रमेश दहीहंडे यांनी जाहीर केले. उपक्रम उद्घाटनासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून उपक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले.