'तो' बिबट्या नाही; शृंगारवाडी शेतवस्तीवर तडसानेच केली शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 18:10 IST2021-11-09T18:09:50+5:302021-11-09T18:10:52+5:30
वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून घेतलेल्या पाऊलखुणावरून संबंधित हिंस्र प्राणी हा बिबट्या नसून तडस असल्याचे घोषित केले

'तो' बिबट्या नाही; शृंगारवाडी शेतवस्तीवर तडसानेच केली शिकार
पैठण ( औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील श्रुंगारवाडी येथील खराद वस्तीवरील शेतात बांधलेल्या वासराचा हिंस्र प्राण्याने सोमवारी रात्री फडशा पाडला. यामुळे परिसरात पुन्हा बिबट्या संचार करत असल्याच्या भितीने शेतशिवार गारठले. गेल्या दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात या भागातील तीघांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून घेतलेल्या पाऊलखुणावरून संबंधित हिंस्र प्राणी हा बिबट्या नसून तडस असल्याचे घोषित केले आहे.
शृंगारवाडी येथील खराद शेत वस्तीवर बांधलेल्या वासराचा अज्ञात प्राण्याने फडशा पाडल्याचे मंगळवारी सकाळी गोविंद खराद यांना आढळून आले. याबाबत त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊन परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा ईशारा दिला. दोन वर्षात तीघांना बिबट्याने ठार केलेले असल्याने परिसरातील शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले मंगळवारी दुपारीच शेतवस्त्या व शेतशिवार निर्मनुष्य झाले. दरम्यान वनपाल राजू जाधव व पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेतशिवारातील ठसे घेऊन वासराची शिकार बिबट्याने नाही तर तडसाने केल्याचा खुलासा केला. यानंतर दहशती खाली असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.