तीन वाहनांना उडवल्यानंतरही तो थांबला नाही; देवादारी सात जणांना उडवले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:14 IST2025-07-05T12:13:13+5:302025-07-05T12:14:35+5:30

प्रत्यक्षदर्शी म्हणतात, एन-१ काळा गणपती मंदिरासमोर आधी गाड्यांच्या धडकेचा स्फोटासारखा आवाज, क्षणार्धात माणसांच्या किंचाळ्या, आरडाओरड

He did not stop even after blowing up three vehicles; He blew up seven people in Devadadari, one died | तीन वाहनांना उडवल्यानंतरही तो थांबला नाही; देवादारी सात जणांना उडवले, एकाचा मृत्यू

तीन वाहनांना उडवल्यानंतरही तो थांबला नाही; देवादारी सात जणांना उडवले, एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : तीन महिन्यांपूर्वी नवीन खरेदी केलेली कार सुसाट वेगात दामटत प्रशांत एकनाथ मगर (३१, रा. एन-१) याने आधी तीन वाहनांना धडक दिली. या धडकांचा मोठा आवाज होऊनही न थांबता प्रशांत बेफामपणे रस्त्यावरील सहा जणांना हवेत उडवत गेला. एन-१ च्या काळा गणपती मंदिरासमोर शुक्रवारी सकाळी घडलेल्या या अपघातात मंदिराची १५ वर्षांपासून सेवा करणारे गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (७०, रा. विठ्ठलनगर, रामनगर) जागीच मृत्युमुखी पडले. त्यांच्या पत्नीसह अन्य सेवेकरी व तीन भाविक गंभीर जखमी झाले. काही क्षणांतच माणसांच्या किंचाळ्या, रस्त्यावरच्या रक्ताने मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांसह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली.

मंदिराच्या मागील परिसरातच राहणारा प्रशांत रोज सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुलात टेनिस खेळायला जातो. ८ वाजता तो जळगाव रोडने पिरॅमिड चौकातून सर्व्हिस रोडवर उतरून काळा गणपती मंदिराच्या दिशेने सुसाट वेगात निघाला. रिक्षाचालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रशांत पिरॅमिड चौकातून भरधाव वेगाने जात होता. तेथे पहिल्यांदा तो एका वाहनाला हूल देत पुढे गेला. मंदिराच्या अलीकडे असलेल्या साकोळकर रुग्णालयाजवळ त्याने एका दुचाकीला धडक दिली. त्यात भांबावलेला प्रशांत बेफाम पुढे जात रुग्णालयासमोरील दोन दुचाकींना उडवून थेट मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत सहा माणसांना अक्षरश: पत्त्यांसारखा उडवत गेला.

आधी महिलेला उडवले, मग तिघांना घेऊन मंदिरावर धडकला
- या संपूर्ण अपघाताचा थरार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यात प्रशांत दुचाकींना उडवल्यानंतर तिरकस दिशेने जात महिलेला उडवताना दिसतो.
- सदर महिला बाजूला फेकली जात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारच्या चाकाजवळ सापडली. दुसऱ्या बेजबाबदार कारचालकाने तरीही न थांबता तिच्या पायावरून कार तशीच नेली.
- तोपर्यंत इकडे प्रशांतच्या कारच्या बोनेटवर तीन जण आदळून थेट मंदिराच्या पायऱ्यांवर फेकले गेले.
- त्याचवेळी विकास समदाने (५०) हे मंदिराच्या पायऱ्या चढत होते तर त्यांची पत्नी मनीषा (४०) या चपलांच्या स्टँडसमोर उभ्या होत्या. समोरून कार येत असल्याचे पाहिल्यानंतर विकास यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात प्रशांतच्या कारने दोघांनाही उडवले.

ही कार थेट मंदिराच्या पायऱ्यांवर चढून पुढे गेली. यात पायऱ्यांना लावलेली ग्रील तुटून काही अंतरावरील वेगाच्या व पार्किंगच्या नियंत्रणाचा फलकही तुटून पडला. अपघाताच्या आवाजानंतर क्षणार्धात किंचाळ्या, आरडाओरड्याने मन सुन्न झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

गंभीर जखमी रुग्णालयात भरती
या घटनेत मनीषा यांच्यासह विकास यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवींद्र भगवंतराव चौबे (६५) यांना घाटी रुग्णालयात तर श्रीकांत प्रभाकर राडेकर (६०) यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंधरा वर्षे सेवा, मंदिराच्या पायऱ्यांवरच मृत्यू
शेवाळे, चौबे गेल्या १५ वर्षांपासून मंदिरात नोकरीस होते. राडेकर स्वेच्छेने मंदिराची सेवा करण्यासाठी अधूनमधून येतात. रोज सकाळी ७ वाजल्यापासून शेवाळे दाम्पत्य मंदिरात दुपारी ३ वाजेपर्यंत सेवा बजावत होते. शेवाळे पूर्णवेळ मंदिराची सुरक्षा, वाहने लावण्याची जबाबदारी पाहत होते. त्यांना मदत करून त्यांची पत्नी तेथेच हार, फुले विकत असे. शुक्रवारी त्यांचा १५ वर्षांचा नित्यक्रम मात्र कायमसाठी थांबला. मंदिराची सेवा करतानाच मंदिराच्या पायऱ्यांवरच शेवाळे यांचा हृदयद्रावक मृत्यू झाला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पाेलिस आयुक्त सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक कैलास लहाने, हरेश्वर घुगे, भरत पाचोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण मार्ग दिवसभर अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आला. मंदिराचे दर्शनही बंद करण्यात आले.

वाहनांना उडवल्यानंतरही वेग कमी का नाही केला ?
मगर अपघातानंतर कार सोडून पसार झाला. स्थानिक त्याला ओळखत असल्याने त्याची माहिती कळताच पोलिस तासाभरात त्याच्या घरापर्यंत पोहोचले. त्याला अटक करून ३ वाजता सहायक निरीक्षक कैलास लहाने यांनी न्यायालयात हजर केले. मगरने कारचा वेेग वाढवण्याचा उद्देश काय होता, वाहनांना उडवल्यानंतरही त्याने वेग कमी करण्याऐवजी कार सुसाट वेगात पुढे नेत माणसांना उडवत का गेला, याचा तपास करायचा असून, कारची कागदपत्रे जप्त करणे बाकी आहे. रक्त तपासणी करायची असल्याचे सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

उच्चशिक्षित, स्पर्धा परीक्षांची तयारी
मगरचे वडील निवृत्त शिक्षक असून, प्रशांतने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन इंग्रजी विषयात एम. ए. उत्तीर्ण केले आहे. तो एका खासगी ट्यूशनमध्ये पाचवी ते बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. अनेक वर्षांपासून प्रशांत एमपीएससी, युपीएससीची देखील तयार करत आहे. नुकतीच त्याने परीक्षा देऊन अवघ्या काही गुणांनी त्याची संधी हुकल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याच्याकडून असा अपघात कसा घडला, वेगावर नियंत्रण का नाही ठेवले? हे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

विश्वस्त मदत करणार
अपघातानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत शेवाळे यांच्यासह जखमी चौबे व राडेकर यांच्या कुटुंबियांना मंडळाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे विश्वस्तांच्यावतीने ‘लोकमत’ला सांगण्यात आले.

दुचाकीच्या धडकेमुळे मी गडबडलो
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रशांतची कसून चौकशी केली. प्रथमदर्शनी त्याने मद्यसेवन केले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, चौकशीत त्याने साकोळकर रुग्णालयाच्या अलीकडे एका दुचाकी चालकाच्या धडकेमुळे गडबडल्याचे सांगितले. दुचाकीच्या त्या धडकेनंतर माझ्याकडून ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला आणि ऑटोमॅटिक कार असल्याने कार वेगात पुढे गेली, असा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याचा दावा खोडून काढत तो पहिल्यापासूनच भरधाव वेगात जात होता, असे सांगितले.

काय आहे फरक ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल कारमध्ये?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मॅन्युअल कार चालवताना डावा पाय क्लचसाठी वापरावा लागतो. तर उजवा पाय ब्रेक आणि एक्सिलेटरसाठी वापरला जातो. या गाडीत गिअरचालकाला स्वतः बदलावे लागतात. त्यामुळे मॅन्युअल कार चालवताना दोन्ही पाय आणि दोन्ही हात यांचा समन्वय असतो. तर ऑटोमॅटिक कारमध्ये क्लच नसतो. फक्त ब्रेक आणि एक्सिलेटर पेडल असतात, जे उजव्या पायाने वापरले जातात. गिअर आपोआप बदलत असल्यामुळे चालकाला फक्त 'ड्राइव्ह, रिव्हर्स, न्युट्रल आणि पार्क' याबाबी लक्षात ठेवाव्या लागतात. परंतु मॅन्युअल कारवर नियंत्रण अधिक राहते.

Web Title: He did not stop even after blowing up three vehicles; He blew up seven people in Devadadari, one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.