बनावट नावांनी जामीन घेऊन त्याने केली चक्क कोर्टाची फसवणूक; आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:24 IST2025-02-28T14:24:16+5:302025-02-28T14:24:32+5:30
आरोपीला एकानंतर दुसऱ्या कलमाखालील शिक्षा भोगावयाची आहे

बनावट नावांनी जामीन घेऊन त्याने केली चक्क कोर्टाची फसवणूक; आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरी
छत्रपती संभाजीनगर : विविध बनावट नावांनी जामीन घेऊन कोर्टाची फसवणूक करणारा आरोपी राजेश किशनराव दाभाडे (४८, रा. भाग्योदय नगर, जालना) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. डी. गुरनुले यांनी विविध कलमाखाली एकूण ५ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंड ठोठावला. एका कलमाखालील शिक्षा भोगल्यानंतर, आरोपीने दुसऱ्या कलमाखालील शिक्षा भोगावी असे आदेशात म्हटले आहे.
असा झाला फसवणुकीचा पर्दाफाश
मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक नितीन राजेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
३ जून २०२१ रोजी ते कार्यालयात दैनंदिन कामकाज करत असताना सिडको पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपी मोबीन अजीज शेख याचा जामीन घेण्यासाठी वकिलामार्फत राजेंद्र हरबक (रा. चापडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याच्या नावे असलेला पी. आर बॉण्ड व इतर दस्ताऐवज सादर करण्यात आले. सदरील कागदपत्रांवरील फोटोवरून सदरील व्यक्तीने यापूर्वी देखील जामीन घेतला असल्याची मराठे यांना शंका आली. त्यांनी तपास केला असता आरोपीने २१ मे २०२१ रोजी मुकुंदवादी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी इम्रान अली रशिद अली या आरोपीचा वकिलामार्फत भागुजी पालवे (रा. करडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याच्या नावे जामीन घेतल्याचे समोर आले. दोन्ही प्रकरणांत नावे वेगवेगळी असून फोटो मात्र एकाच व्यक्तीचा असल्याचे उघडकीस आले. मराठे यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली. न्यायालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. याबाबत वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याची सुनावणी आणि शिक्षा
तपास अधिकारी राहुल भादर्गे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक सरकारी वकील आनंद पाईकराव आणि जे. आय. परकोटे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी राजेश दाभाडे याला दोषी ठरवून भादंवी कलम ४६७ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४२० अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४१९ अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, कलम ४६८ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि कलम ४७१ अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.