शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का? जाणून घ्या शेवटची तारीख आणि नियम

By विजय सरवदे | Updated: March 4, 2023 19:12 IST2023-03-04T19:11:44+5:302023-03-04T19:12:10+5:30

छत्रपती संभाजीनगरात ५४६ शाळांत ४ हजार ६९ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव

Have you applied for free admission to school? Deadline till March 17 | शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का? जाणून घ्या शेवटची तारीख आणि नियम

शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का? जाणून घ्या शेवटची तारीख आणि नियम

छत्रपती संभाजीनगर : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवर ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली असून, १७ मार्चपर्यंत पालकांना आररटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतील. स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित ५४६ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये एकूण ४ हजार ६९ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या जागा थोड्या कमी झाल्या आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले होते. शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, आता मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. आपल्या पाल्याचा या राखीव जागेवर नंबर लागलाच पाहिजे, यासाठी पालक एकापेक्षा अधिक अर्ज भरतात. मात्र, यंदापासून एकाच नावासाठी अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात ५४६ शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार

यंदा ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ५४६ शाळांनी नोंदणी केली असून, आपल्या पाल्यांसाठी या शाळांत मोफत प्रवेशासाठी पालकांना अर्ज करावा लागणार आहे.

मोफत प्रवेशाच्या चार हजार जागा
‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५४६ शाळांमध्ये ४ हजार ६९ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

१७ मार्चपर्यंत मुदत
मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

- कोणाला मिळतो मोफत प्रवेश ?
वंचित घटकात अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागासप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, हे विद्यार्थी मोफत प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्याच्या आधारावर या गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येतो. याशिवाय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असावे. कोरोनामध्ये पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवेश मिळणार आहे.

 काय कागदपत्रे लागतात ?
- रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल आदी.
- आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला.
- विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला.
- विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.

मुदतवाढ मिळणार नाही
आरटीईअंतर्गत १ मार्चपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मार्चपर्यंत पालकांना आपल्या पाल्याच्या मोफत प्रवेशासाठी अर्ज करता येतील. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही.
- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी

Web Title: Have you applied for free admission to school? Deadline till March 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.