क्रीडा विभागाचे २१.५९ कोटी लंपास करणारा हर्षकुमार सहा दिवसांपासून पसारच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:30 IST2024-12-26T11:28:11+5:302024-12-26T11:30:16+5:30
साताऱ्यात वडिलांच्या नावेदेखील फ्लॅट, एका फ्लॅटमध्ये भरपूर दागिने, रोकड; चौकशीच्या ससेमिरा लागण्याच्या भीतीने क्रीडा विभागाचे धाबे दणाणले

क्रीडा विभागाचे २१.५९ कोटी लंपास करणारा हर्षकुमार सहा दिवसांपासून पसारच
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडासंकुलात कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेला हर्षकुमार क्षीरसागर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, तपास पथक त्याच्या संपत्तीची चौकशी करत असून साताऱ्यात विकत घेतलेल्या फ्लॅटपैकी एक फ्लॅट वडिलांच्या नावे घेतला आहे. घोटाळ्यातील रकमेतून जीवन कार्यप्पा विंदडानेदेखील एक फ्लॅट खरेदी केला आहे.
शनिवारी रात्री विभागीय क्रीडासंकुलाच्या घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर क्षीरसागरसोबत भ्रष्टाचारातील भागीदार यशोदा शेट्टी व तिचा पती जीवन यांना अटक करण्यात आली. मात्र आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता लक्षात येताच हर्षकुमार पसार झाला. प्रेयसीसह वडिलांच्या नावावरदेखील त्याने साताऱ्यातील चाटे स्कूल परिसरात फ्लॅट घेतला आहे. त्याच परिसरात जीवननेही एक फ्लॅट खरेदी केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले. बुधवारी दिवसभर तपास पथकाकडून हर्षकुमार व जीवनने खरेदी केलेल्या फ्लॅट व आतील साहित्याचा पंचनामा सुरू होता.
कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदाराचीदेखील चौकशी होणार
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांसह कंत्राटी कर्मचारी करणाऱ्या एजन्सीचीदेखील चौकशी होणार आहे. हर्षकुमारची नियुक्ती कुठल्या आधारावर केली गेली, अन्य कर्मचारी कशा प्रकारे नियुक्त केले जातात, ते करत असलेल्या कामाचे ऑडिट होते की नाही, या सर्व मुद्द्यांवर पोलिस तपास करत आहेत.
सोन्याच्या दागिन्यांसह महागड्या वस्तूंचा संच
हर्षकुमारने घोटाळ्यातील बहुतांश रक्कम प्रेयसी व स्वतःच्या आवडीनिवडीवर खर्च केली. घर, वाहनांव्यतिरिक्त तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्यंत महागड्या वस्तू आढळून आल्या आहेत. पोलिसांनी फ्लॅट ताब्यात घेतले आहेत.