केलेले कष्ट अन् खर्च वाया; कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:10 IST2024-12-31T16:10:07+5:302024-12-31T16:10:59+5:30

भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिला भाजीपाला; कवडीमोल दरांमुळे व्यक्त केला संताप

Hard work and expenses wasted; Farmers throw vegetables on the road due to low prices | केलेले कष्ट अन् खर्च वाया; कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला रस्त्यावर

केलेले कष्ट अन् खर्च वाया; कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला रस्त्यावर

पाचोड : येथील रविवारच्या आठवडी बाजारात योग्य भाव मिळाला नसल्याने वडजी व कचनेर येथील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली.

पाचोड येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात परिसरातील गावांमधील शेतकरी पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणातात. त्यानुसार रविवारी सकाळी नऊ वाजता वडी, वडजी, निहालवाडी आणि कचनेर येथील शेतकऱ्यांनीही आठवडी बाजारात विक्रीसाठी आपल्या शेतात पिकविलेली मेथी, कोथिंबीर आणि वांगे विक्रीसाठी आणले होते. गेल्या आठवड्यातील बाजारात मेथी व कोथिंबीर १० रुपयांना प्रत्येकी १ जुडी मिळत होती. त्याच मेथी व कोथिंबिरीच्या १० रुपयांना ४ जुड्या रविवारच्या आठवडी बाजारात विकल्या जात होत्या; तर गेल्या आठवड्यात ४० रुपये किलोने विकले जाणारे वांगे या आठवड्यात २० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. या भाजीपाल्याची लागवड, तोड आणि बाजारात विक्रीसाठी आणण्याचा वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने अंबड तालुक्यातील वडी लासुरा येथील शेतकरी रमेश जटाडे, वडजी येथील शेतकरी विठ्ठल भांड आणि कचनेर येथील शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी रस्त्यावरच कोथिंबीर, मेथी आणि वांगे फेकून देत संताप व्यक्त केला.

केलेले कष्ट अन् खर्च वाया गेला
महागडे बियाणे, रोप खरेदी करून लागवड केली. दिवसा वीज राहत नसल्याने रात्री जीव धोक्यात घालून पाणी दिले. तसेच महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. चांगला भाव मिळून आर्थिक चणचण दूर होईल, या आशेने वाहतुकीचा खर्च करून भाजीपाला बाजारात आणला; परंतु त्यास कवडीमोल दर मिळत असल्याने निराशा आली. त्यातून हा भाजीपाला फेकून दिल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर हे शेतकरी गावी निघून गेले.

Web Title: Hard work and expenses wasted; Farmers throw vegetables on the road due to low prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.