सहायक फौजदाराच्या पत्नीच्या घरातच गुटख्याचा साठा, पोलिसांनी छापा टाकल्यावर 'अड्डा' उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:44 IST2025-11-28T18:42:35+5:302025-11-28T18:44:23+5:30
अन्न, औषध प्रशासनाची सातारा पोलिसांसह कारवाई; ३६ लाखांचा साठा जप्त

सहायक फौजदाराच्या पत्नीच्या घरातच गुटख्याचा साठा, पोलिसांनी छापा टाकल्यावर 'अड्डा' उघड
छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस दलातील एका सहायक फौजदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या घरातच गुटख्याचा लाखाे रुपयांचा साठा असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने सातारा पोलिसांच्या सहकार्याने २६ नोव्हेंबर रोजी साताऱ्यातील मार्तंडनगरमध्ये छापा मारल्यानंतर ही बाब समोर आली. याप्रकरणी त्यांचे घर भाड्याने घेतलेल्या गुटख्याचा तस्कर ताबिश खान झियाउद्दीन खान (३३, रा. जालाननगर) याला पोलिसांनी अटक केली.
अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांना २६ नोव्हेंबरला साताऱ्याती मार्तंडनगरमध्ये ताबिश खान नावाच्या व्यक्तीने एका घरात मोठ्या प्रमाणात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. साताऱ्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मदतीने जाधवर आणि त्यांच्या पथकाने दुपारी ३ वाजता तेथे छापा टाकला. पाहणीत घराच्या तीन खोल्यांत गुटखा, तंबाखू, जर्दाचे पोते मिळून आले. मोजणीत ते सर्व ३६ लाख ६ हजार रुपयांचा गुटखा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जाधवर यांच्या तक्रारीवरून ताबिशवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. उपनिरीक्षक गाेविंद एकिलवाले यांनी ताबिशला गुरुवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिस पत्नीच्या नावे घर, पोलिसही हैराण
शहर पोलिस दलातील एका सहायक फौजदाराच्या पत्नीच्या नावे सदर घर आहे. अन्न व औषध प्रशासनाने मूळ घरमालकाची माहिती घेतली असता ताबिशने ही बाब सांगितली. त्यानंतर आपल्याच सहकाऱ्याच्या पत्नीच्या नावे घर असल्याचे कळाल्यानंतर पोलिसही हैरान झाले. विशेष म्हणजे, ताबिशवर यापूर्वी जिन्सी पोलिस ठाण्यात गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल आहे.