कंटेनरने हुलकावणी दिल्याने गुजरातच्या भाविकांची बस उलटली; ३६ प्रवासी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 15:25 IST2023-09-09T15:24:35+5:302023-09-09T15:25:22+5:30
मदतीसाठी धावले ग्रामस्थ; गुजरातमधील सुरत येथून वेरूळ येथे जाणाऱ्या भाविकांची खासगी बस देवगाव रंगारीजवळ उलटली.

कंटेनरने हुलकावणी दिल्याने गुजरातच्या भाविकांची बस उलटली; ३६ प्रवासी बचावले
देवगाव रंगारी (जि. औरंगाबाद) : सुरत येथून वेरूळ येथील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या खासगी बसला समोरून येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिल्याने खासगी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस उलटल्याची घटना छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावर देवगाव रंगारीजवळ शुक्रवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गुजरातमधील सुरत येथील गुजराती दिगंबर जैन महासंघाचे ३६ भाविक सुरत ते वेरूळ व पुणे अशा धार्मिक यात्रेला खासगी बस (जीजे १४, झेड ०१११)ने वेरूळकडे येत असताना देवगाव रंगारीजवळ समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने या बसला हुलकावणी दिली. त्यामुळे बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली उतरून पलटी झाली. यावेळी अचानक जोराचा आवाज झाल्याने बाजूच्या शेतात काम करणारे सर्फराज शेख, गलसिंग चव्हाण, बाळू रनमळे, अश्रफ अली, युसुफ कुरैशी, जगदीश काकडे, योगेश गायकवाड यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गोकुळ गोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संपत दळवी, पो. हे. काॅ. ऋषिकेश पैठणकर या कर्मचाऱ्यांसह धरम भोसले, गहिनीनाथ रनमळे या ग्रामस्थांनी अपघातस्थळी येत बसमध्ये अडकलेल्या भाविकांना सुखरूप बाहेर काढले.
दुसऱ्या बसने भाविकांना केले रवाना
याचवेळी १०२ रुग्णवाहिकेचे चालक सुनील कापुरेही दाखल झाले. या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी भाविकांना संबंधित खासगी बसच्या दुसऱ्या वाहनातून रवाना केले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.