हमीभाव फक्त कागदावर! शेतमाल कवडीमोल दरात विकण्याची वेळ; शासकीय केंद्रांची प्रतीक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:45 IST2025-11-08T15:44:35+5:302025-11-08T15:45:26+5:30
सोयाबीनला लासूर स्टेशनमध्ये तर कापसाला सिल्लोडमध्ये सर्वाधिक दर

हमीभाव फक्त कागदावर! शेतमाल कवडीमोल दरात विकण्याची वेळ; शासकीय केंद्रांची प्रतीक्षा!
- श्यामकुमार पुरे/रामेश्वर श्रीखंडे
सिल्लोड/लासूर स्टेशन : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना त्यातून वाचलेला मका, कापूस आणि सोयाबीन हा शेतमाल बाजारात येण्यास सुरुवात झाली असून सोयाबीनला लासूर स्टेशनमध्ये ४ हजार २५० रुपये तर कापसाला सिल्लोडमध्ये ७ हजार रुपये प्रति क्विंटलचा सर्वाधिक भाव मिळत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांकडून शेतमालाची खरेदी सुरू आहे.
सिल्लोड बाजार समितीत कापसाची दररोज ५०० क्विंटल, मक्याची ८०० क्विंटल तर सोयाबीनची २०० क्विंटल आवक होत आहे. येथे गेल्या वर्षी कापसाला ६ हजार ते ६९०० रुपये भाव मिळाला होता. यावर्षी ४ हजार ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. गेल्या वर्षी मक्याला २ हजार ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. तो यावर्षी १ हजार २५० ते १ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार २०० पर्यंत भाव मिळाला होता. यावर्षी ४ हजार २२० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. सीसीआयकडून अद्याप कापूस, मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. येत्या आठ दिवसांत खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती सिल्लोड बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी दिली. नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी केंद्र १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू केले जाईल, अशी माहिती खासगी ॲग्रो कंपनीचे संचालक आकाश गौर यांनी दिली.
३६ हजार क्विंटल मक्याची खरेदी
दिवाळीपासून ते ६ नोव्हेंबरपर्यंत सिल्लोड तालुक्यातील खासगी १३ जिनिंगमध्ये १६ हजार क्विंटल कापूस सरासरी ६ ते ७ हजार रुपये भावाने खासगी बाजारात खरेदी करण्यात आला आहे. तसेच सोयाबीन ३ हजार ५०० रुपये भावाने ५ हजार ५३४ क्विंटल, तर १ हजार २०० ते १ हजार ६०० च्या भावाने मका ३६ हजार क्विंटल खरेदी करण्यात आला आहे.