अनागारिक धम्मपाल, पेरियार नायकर व भय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:02+5:302021-09-22T04:06:02+5:30

बहुजन सामाजिक - सांस्कृतिक मंच, प्रबुध्द युवा परिवर्तन विचार मंच, नॉन पॉलिटिकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंट, बाबा दळवी ...

Greetings to Anagarik Dhammapal, Periyar Naikar and Bhayyasaheb Ambedkar | अनागारिक धम्मपाल, पेरियार नायकर व भय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अनागारिक धम्मपाल, पेरियार नायकर व भय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बहुजन सामाजिक - सांस्कृतिक मंच, प्रबुध्द युवा परिवर्तन विचार मंच, नॉन पॉलिटिकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंट, बाबा दळवी विचार मंचतर्फे ही अभिवादन सभा घेण्यात आली. बुध्द धम्म प्रचार व प्रसाराच्या कार्यात अनागारिक धम्मपाल यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी बुध्दगया येथील महाबोधी विहाराचा जीर्णोध्दार केला, असे भन्ते करुणानंद थेरो यांनी सांगितले.

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. संजय मून यांनी अनेक तपशील सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांडपंडिताच्या या मुलाला वारसाहक्काने मिळणारे नेतृत्वही मिळू दिले गेले नाही. भय्यासाहेबांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण बाबासाहेबांचे त्यांच्याकडे पुत्र म्हणून तेवढेच बारीक लक्ष होते. त्यांची क्षमता लक्षात घेऊन शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना अमृतसरला पाठवले होते, अशी माहिती डॉ. मून यांनी दिली.

पेरियार रामास्वामी नायकर हे क्रांतिकारी होते. त्यांनी बुध्द, फुले व आंबेडकरी तत्त्वज्ञान महाराष्ट्राकडून स्वीकारले. दक्षिण भारतात परिवर्तन घडवून आणले. महाराष्ट्रात मात्र या महामानवांचा फक्त जयजयकार केला जातो, त्यांचे तत्त्वज्ञान मात्र पूर्णपणे स्वीकारले जात नाही, अशी खंत रामास्वामी नायकर यांच्या कार्याचे अभ्यासक भीमराव सरवदे यांनी व्यक्त केली. ‘असा लढलो मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा’ या विषयावर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉ. मनोहर टाकसाळ यांनी अनेक प्रसंग सांगितले. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुख्य संयोजक रामभाऊ पेटकर यांनी प्रास्ताविक केले. राजाभाऊ शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. कीर्तिलता पेटकर यांनी आभार मानले. नेहा राऊत या मुलीने क्रांतीगीत सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Greetings to Anagarik Dhammapal, Periyar Naikar and Bhayyasaheb Ambedkar