बंधारा दुरुस्तीचे ३.५९ कोटींचे सरकारी अंदाजपत्रक; खाजगीत झाले १३ लाखांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:49 PM2019-08-26T14:49:47+5:302019-08-26T14:53:51+5:30

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर निशाणा साधला.

Government budget of Rs 3.59 crore for Bandhara repair; Private contractor did in 13 lakhs | बंधारा दुरुस्तीचे ३.५९ कोटींचे सरकारी अंदाजपत्रक; खाजगीत झाले १३ लाखांत

बंधारा दुरुस्तीचे ३.५९ कोटींचे सरकारी अंदाजपत्रक; खाजगीत झाले १३ लाखांत

googlenewsNext
ठळक मुद्देपावसामुळे बंधारा वाहून गेला. खर्च द्यायचा कसा, यात बंधाऱ्याची दुरुस्ती फसली होती.

औरंगाबाद : २०१५ च्या सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने बोरगाव येथील बंधारा दोन्ही बाजूंनी फुटला होता. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सरकारी अंदाजपत्रक ३ कोटी ५९ लाखांचे पाठविण्यात आले होते. पुढील पावसाळ्यापूर्वी काम करण्यासाठी खूप प्रयत्न केला; परंतु खर्चाच्या मुद्यावरून काम अडकले. शेवटी एका खासगी कंत्राटदाराकडून हे काम करून घेतले. त्यासाठी कंत्राटदाराने केवळ १३ लाख ५० हजार रुपयांचे बिल दिले, असे सांगत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२५) पाणी परिषदेत शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर निशाणा साधला.

एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात घेतलेल्या दोनदिवसीय राज्यस्तरीय पाणी परिषदेचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी हरिभाऊ बागडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, मिलिंद पाटील, मधुकरअण्णा वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले, पाणी परिषदेत अधिकारी आहेत. लोकसहभागातून काम केल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. पावसामुळे बंधारा वाहून गेला. त्यावेळी जिल्हा परिषदेला अधिकाऱ्यांनी २० कोटींचा प्रस्ताव सादर केलेला होता; परंतु आधीचेच देणे आहे, असे मंत्रालयातून सांगण्यात आले. १६४ कोटी रुपयांचा हा भार होता. मंत्र्याशी बोललो, मात्र काही उपयोग झाला नाही. खर्च द्यायचा कसा, यात बंधाऱ्याची दुरुस्ती फसली होती. पावसाळ्यापूर्वी एका कंत्राटदाराने १३.५० लाखांत ते काम केले. त्यासाठी ३ कोटी ५९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक पाठविले होते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.

पाणी अडवले, तर दु:ख नको
वरच्या भागात पाणी अडविल्याने धरणे कोरडी झाली, असे म्हटले जाते; परंतु धरणाचे पाणी हे खालीच येत असते. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. गावात, शिवारात पडणाऱ्या पाण्यावर तिथल्याच लोकांचा हक्क असला पाहिजे. त्यामुळे कोणी पाणी अडवले, तर दु:ख मानू नये, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

जलसंवर्धनाची चळवळ तरुणांनी पुढे न्यावी 
रविंदर सिंगल म्हणाले, जलसंवर्धनाची चळवळ ही पुढे घेऊन जायची आहे. त्यासाठी तरुणांकडून खूप अपेक्षा आहे. मी पोलीस अधिकारी असलो तरी एक नागरिक आहे. पुढच्या पिढीसाठी काम करायचे आहे. सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी काम केले जाईल. त्यासाठी सर्वसामान्यांची साथ मिळेल. विजयअण्णा बोराडे म्हणाले, पाण्याचे महिलांना अधिक गांभीर्य असते. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त महिलांचा सहभाग झाला पाहिजे.

खाम नदीचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील
रविंदर सिंगल म्हणाले, परिषदेत एकाच वेळी अनेक तज्ज्ञ एकत्र आले. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून समोर आलेल्या मुद्यांचे पाणी परिषदेची समिती डॉक्युमेंटशन करणार आहे. या मुद्यांसंदर्भातील अ‍ॅक्शन प्लॅन आगामी आठ ते दहा दिवसांत शासनाला सादर केला जाईल. खाम नदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी घेतील.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. शैलेंद्र गायकवाड, भास्कर पेरे, पंडित वासरे, हेमंत बेलसरे, नाम फाऊंडेशनच्या शुभा महाजन, रेनबो फाऊंडेशनचे प्रशांत परदेशी, उपविभागीय अभियंता अरुण घाटे, शीतल गायकवाड यांचे व्याख्यान झाले. गायक राजेश सरकटे, गायिका संगीता भावसार यांनी पाण्याविषयी जनजागृती करणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले. प्रा. प्रशांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेंद्र गायकवाड, राहुल रायकर, श्याम दंडे, किरण बिडवे आदी उपस्थित होते. 

Web Title: Government budget of Rs 3.59 crore for Bandhara repair; Private contractor did in 13 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.