छत्रपती संभाजीनगर : ३० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर मापावरून वाद घालत सात ते आठ जणांच्या टोळीने झाल्टा फाट्यावरील पेट्रोलपंपावर राडा घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याकडील १ लाख ३७ हजार रुपये हिसकावून पोबारा केला. १२ मे रोजी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.
भुरेखान बन्नेखान पठाण (वय ३२) हे झाल्टा शिवारातील शिवदत्त पेट्रोलपंपावर गेल्या १२ वर्षांपासून नोकरी करतात. सोमवारी रात्री ते सहकारी बाळू खडके, मच्छिंद्र म्हस्के, किशोर घुगे यांच्यासोबत पंपावर काम करत होते. साधारण ११:१५ वाजता त्रिपलसीट दुचाकीस्वार पंपावर आले व ३० रुपयांचे पेट्रोल भरले. मात्र, ३० रुपयांत एवढेच येते का, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. भुरे खान यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत त्यांना मारहाण सुरू केली. अन्य सहकारी त्यांना समजावून सांगत असताना लाथाबुक्क्यांनी वार केले.
मग टोळी येऊन धडकलीसुरुवातीला तिघांनी वाद सुरू करुन कॉल करून टोळीच्या अन्य साथीदारांना बोलावून घेतले. जवळपास सात ते आठ जणांनी पंपावर राडा घातला. भुरे खान यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिशातील पेट्रोल-डिझेलचे जवळपास १ लाख ३७ हजार रुपये काढून घेतले.
कोयता उपसलाटोळीने अचानक तीन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवल्याने कर्मचारी घाबरून गेले. रात्रीची वेळ असल्याने कोणीही त्यांच्या मदतीसाठी धावून आले नाही. गुंड त्यांच्या खिशातील पैसे काढून घेताना कर्मचाऱ्यांनी विरोध केला. मात्र, टोळीतील एकाने थेट काेयता काढून त्यांचा पाठलाग सुरू केल्याने कर्मचाऱ्यांनी जवळील शेतात धाव घेतली. या गंभीर प्रकारामुळे मात्र झाल्टा फाट्यावरील व्यावसायिक चांगलेच घाबरून गेले. चिकलठाणा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.