छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज; शिर्डी-तिरुपती नवी एक्स्प्रेस, जाणून घ्या थांबे, वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:00 IST2025-12-11T15:59:44+5:302025-12-11T16:00:02+5:30
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील धार्मिक स्थळांना भेटी देणं आता सोपं होणार आहे. साईनगर शिर्डी ते तिरुपती नवीन एक्सप्रेस सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज; शिर्डी-तिरुपती नवी एक्स्प्रेस, जाणून घ्या थांबे, वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तिरुपती ते साईनगर शिर्डीसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारी नवी साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. मात्र, नव्या गाडीच्या उद्घाटनासोबतच जुन्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने काही प्रवाशांना फटका बसला आहे.
आस्था आणि धार्मिक पर्यटनाला चालना
तिरुपती-साईनगर शिर्डी ही नवी एक्स्प्रेस धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देणार आहे. या गाडीला छत्रपती संभाजीनगरसह एकूण ३१ थांबे असतील. यामध्ये नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड हे महत्त्वाचे थांबे राहणार आहेत. विशेषतः १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथ येथे देखील ही गाडी थांबणार असल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे. रेल्वेच्या सूत्रांनुसार, या नवीन एक्स्प्रेसचे डिझाइन प्रामुख्याने दक्षिण भारतातील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरला या गाडीत ४० ते ४५ जागांचा कोटा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांना दिलासा
ही एक्स्प्रेस ९ डिसेंबरला पहिल्यांदा धावली असून, १४ डिसेंबरपासून नियमित सेवा सुरू होत आहे. दर रविवारी सकाळी ४ वाजता तिरुपतीहून सुटणारी ही गाडी सोमवारी सकाळी ६.१५ वाजता छत्रपती संभाजीनगरला आणि सकाळी १०.४५ वाजता शिर्डीला पोहोचेल. दक्षिणेकडून येणाऱ्या भाविकांना यामुळे एकाच दिवसात साईदर्शन करून परत जाण्याची सोय झाली आहे.
पण... परतीच्या प्रवासात अडचणी:
छत्रपती संभाजीनगरहून तिरुपतीकडे जाणारी गाडी उपलब्ध असली तरी, परतीचा मार्ग तितका सोयीस्कर नाही. भाविक शिर्डीला सकाळी पोहोचतात, पण परतीसाठी त्यांना थेट संध्याकाळी ७.३५ वाजता उपलब्ध होणारी एकमेव गाडी पकडावी लागते. यामुळे वेळेचे बंधन आणि जागेची मर्यादा प्रवाशांसाठी अडचणीची ठरू शकते.
आरक्षण रद्द, प्रवाशांत नाराजी
संभाजीनगरकरांना साप्ताहिक गाडी कायमस्वरूपी दिल्याचा लाभ मिळाला असला, तरी या बदल्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या तिरुपती-शिर्डी विशेष गाड्यांच्या १४, २१ आणि २८ डिसेंबरच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला असून, त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.