खुशखबर ! शहराला आणखीन २०० शहर बस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 19:07 IST2021-01-30T19:06:17+5:302021-01-30T19:07:55+5:30
Aurangabad Municipal Corporation केंद्र शासनाने आणखीन दोनशे बसबद्दल नवीन योजना तयार केली आहे.

खुशखबर ! शहराला आणखीन २०० शहर बस मिळणार
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या शहरात १०० बसेस नागरिकांना सेवा देत आहेत. शहरासाठी आणखी २०० बस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. या योजनेतून शहराला मदत मिळणार असून, यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम औरंगाबादस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरु आहे.
शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बससेवा सुरु केली आहे. सध्या शंभर बस या माध्यमातून चालवल्या जातात. केंद्र शासनाने आणखीन दोनशे बसबद्दल नवीन योजना तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहरासाठी आणखी दोनशे बस प्राप्त होऊ शकतील, अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादचा दोनशे बसचा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर करावा, यासाठी खासदार डॉ. इम्तियाज जलील व भागवत कराड यांचीदेखील मदत घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीमधील बससेवा दहा वर्ष सुरू राहील, यादृष्टीने नियोजन केलेले आहे. केंद्र शासनाकडून भविष्यात आणखी २०० बसेस मिळाल्या तर वीस वर्षे या सेवेकडे बघण्याची गरज राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.