गौरवास्पद! एड्सवरील औषधांसाठी कुलगुरू प्रमोद येवले यांना मिळाले तिसरे पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 19:52 IST2022-03-10T19:49:21+5:302022-03-10T19:52:35+5:30
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सध्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) प्रभारी अध्यक्षपदी कार्यरत आहेत.

गौरवास्पद! एड्सवरील औषधांसाठी कुलगुरू प्रमोद येवले यांना मिळाले तिसरे पेटंट
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना भारत सरकारच्या इंटेलेक्युअल प्राॅपर्टी या संस्थेने तिसरे पेटंट जाहीर केले आहे. त्यांनी एड्सवर उपचारासाठी इतर औषधांसह वापरले जाणारे डॉल्युटेग्रावीर हे औषध विकसित केले आहे.
‘इंट्रानासल नॅनोकंपोझिट ऑफ डॉल्युटेग्रावीर फाॅर दि सीएनएस डिलिव्हरी’ यासाठी हे पेटंट मिळाले असून, पुढील २० वर्षांच्या कालावधीसाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. आरती व्ही. बेलगमवार व डॉ. शगुप्ता खान यांच्या नावाने हे पेटंट असणार आहे. तशा आशयाचे प्रमाणपत्र कुलगुरू डॉ. येवले यांना प्राप्त झाले आहे. कुलगुरू डॉ. येवले यांना यापूर्वी दोन पेटंट मिळालेले आहेत. डॉ. येवले हे सध्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) प्रभारी अध्यक्षपदी कार्यरत आहेत. या कौन्सिलच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांच्या यशामध्ये तिसऱ्या पेटंटची भर पडल्याबद्दल विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
एड्स उपचारावरील औषधाचा शोध
एचआयव्ही, एड्सवर उपचारासाठी इतर औषधांसह वापरले जाणारे डॉल्युटेग्रावीर या ब्रँडचे हे ॲटीरेट्रोव्हायरल औषध आहे. संभाव्य एक्सपोजरनंतर एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी, पोस्ट एक्सपोजर प्रोफिलाॅक्सिसचा भाग म्हणून देखील याचा वापर केला जाऊ शकतो. ही औषधी तोंडाद्वारे घेतली जाते.