मुलीने दाखवलं धाडस, एकास घेतला चावा; रस्ता न सापडल्याने कार सोडून पळाले अपहरणकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:15 IST2025-07-17T12:13:29+5:302025-07-17T12:15:50+5:30
अपहरणकर्त्यांच्या कारमध्ये बनावट नंबर प्लेटचा साठा, बीअरच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्चा, काळे मास्क व मोठ्या आकाराचा स्कार्फ सापडला.

मुलीने दाखवलं धाडस, एकास घेतला चावा; रस्ता न सापडल्याने कार सोडून पळाले अपहरणकर्ते
छत्रपती संभाजीनगर: क्रिस्टल वाइन शॉपसमोर नेहाला ( नाव बदलेले आहे) सोडल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कार महावितरणच्या कार्यालयाकडून तुळजाभवानी चौकातून भारतनगरच्या दिशेने नेली. मात्र, साराराजनगरमध्ये अरुंद गल्लीबोळांत रस्ताच संपल्याने कार पुढे नेण्यास दिशाच सापडली नाही. परिणामी, कार तशीच सोडून त्यांनी पळ काढला.
८०० मीटरमधील धरार
गारखेड्यातील नाथ प्रांगणापासून ५०० मीटर अंतरावरील वाइन शॉपसमोर अपहरणकर्त्यांनी नेहाला सोडून पोबारा केला. पुढे ३०० मीटर अंतरावर साराराजनगरमध्ये त्यांना कार सोडून पोबारा करावा लागला. एकूण ८०० मीटर अंतरात हा नाट्यमय थरार घडला.
कारमध्ये बीअर, मास्क, स्कार्फ
अपहरणकर्त्यांच्या कारमध्ये बनावट नंबर प्लेटचा साठा, बीअरच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्चा, काळे मास्क व मोठ्या आकाराचा स्कार्फ सापडला. झटापटीत चाकू लागल्याने सीट रक्ताने माखले होते. कारचा क्रमांक बनावट लावून, त्यावरील शेवटचे दोन क्रमांक खोडण्यात आले होते, कार जवळपास तीन वेळा विकली आहे. कारच्या मूळ मालकाचा पत्ता पुण्यातील असून, तिसरा खरेदीदार शहरातीलच असल्याचे पोलिसांनी सांगितले. दीड महिन्यांपूर्वीच त्याने कार खरेदी केली आहे.
धीट नेहा : आजोबांचा नंबर १००, वडील पोलिस
नेहाला आपले अपहरण झालेय, हे समजले होते. मात्र, धीट नेहा डगमगली नाही. अपहरणकर्त्यांनी कारमध्ये नेहाला तिच्या आजोबांचा मोबाइल क्रमांक मागितला. तिने मात्र पोलिसांचा नियंत्रण कक्षाचा क्रमांक १०० सांगितला. वडिलांविषयी विचारल्यावर वडील पोलिस असल्याचे सांगितले. यामुळे अपहरणकर्तेही भांबावले. नेहाने एका अपहरणकर्त्याच्या हाताला कडकडून चावाही घेतला.
चालक छेडे दहा वर्षांपासून कुटुंबासोबत
नेहाच्या आजोबांनी नियुक्त केलेले चालक नवनाथ छेडे यांनी जीवाची पर्वा न करता अपहरणकर्त्यांना विरोध करत नेहाला सोडवण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षापासून ते त्यांच्यासाठी नोकरी करतात. त्यांच्या घराखाली ते कुटुंबासह राहतात.
वरिष्ठ पोलिसांची धाव, सहा पथके रवाना
मुलीच्या अपहरणामुळे पोलिस विभागही हादरला. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, गुन्हे शाखेचे संभाजी पवार, सायबर पोलिस ठाण्याचे शिवप्रसाद पांढरे यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहा पथकांना तपासाची जबाबदारी निश्चित करून रवाना करण्यात आले.
चैतन्य तुपे अपहरणाच्या घटनेची पुनरावृत्ती
फेब्रुवारीत एन-४ मधील चैतन्य तुपे या चिमुकल्याच्या अपहरणाने शहर हादरले होते. पुन्हा बनावट नंबर प्लेट, कारमध्ये खोट्या नंबर प्लेटचा साठा, सायंकाळच्या वेळीच अपहरणाच्या घटनेच्या पुनरावृत्तीने सर्वच अचंबित झाले.
व्यवसाय, कौटुंबिक पार्श्वभूमीच्या अनुषंगाने तपास
घटनेमुळे हादरलेल्या पोलिसांनी सर्व दिशांनी तपास सुरू केला. नेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी, आजोबांच्या व्यवसायाची माहिती घेतली.
-शिवाय, सायबर पोलिसांकडून तांत्रिक पद्धतीने विश्लेषण सुरू करण्यात आले.
-अपहरणकर्त्यांना नेहाच्या ट्यूशनची वेळ माहीत होती. विशेष म्हणजे, बुधवारी नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा ट्यूशन सुटूनही अपहरणकर्ते तेथे दाखल झाले. त्यामुळे ते नेहाच्या मागावर होते, असा दाट संशय पाेलिसांना आहे. मात्र, त्यांना रस्त्याची नीटशी माहिती नसल्याचेही स्पष्ट झाले.