कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा म्हैसमाळची गिरिजादेवीची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:17 IST2021-02-20T18:15:49+5:302021-02-20T18:17:08+5:30
माघ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी श्री. गिरिजा देवी मंदिर देवस्थान ( म्हैसमाळ ता. खुलताबाद ) येथे यात्रा उत्सव साजरा होत असतो.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा म्हैसमाळची गिरिजादेवीची यात्रा रद्द
खुलताबाद : प्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ येथील श्री. गिरिजादेवीची दरवर्षी भरणारी यात्रा तहसील प्रशासन व मंदीर देवस्थान समितीच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार तथा श्री. गिरिजादेवी मंदीर देवस्थान समितीचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख यांनी दिली.
माघ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी श्री. गिरिजा देवी मंदिर देवस्थान ( म्हैसमाळ ता. खुलताबाद ) येथे यात्रा उत्सव साजरा होत असतो. परंतु संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाचे मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या करिता या वर्षी दिंं. 26 फेब्रूवारी ते 1 मार्च या कालावधीत श्री गिरिजा देवी मंदिर परिसरात यात्रा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. यामुळे या कालावधीत मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे दुकाने, पाळणे, तमाशा, इतर धार्मिक कंदुरीचे कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा ही प्रशासनाने दिला आहे.
माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारे धार्मिक विधी व पूजा परंपरे प्रमाणे केल्या जातील. भाविकांना मंदिराच्या गाभार्यात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करताना सुरक्षेकरीता मास्क वापरणे सामाजिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा विचार करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.