‘जीबीएस’चा रुग्ण होऊ शकतो १५ दिवसांत बरा; आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:47 IST2025-01-30T16:47:08+5:302025-01-30T16:47:23+5:30

घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

GBS patient can recover in 15 days; Health system on alert | ‘जीबीएस’चा रुग्ण होऊ शकतो १५ दिवसांत बरा; आरोग्य यंत्रणा सतर्क

‘जीबीएस’चा रुग्ण होऊ शकतो १५ दिवसांत बरा; आरोग्य यंत्रणा सतर्क

छत्रपती संभाजीनगर : पुण्यासह राज्यभरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु हा आजार नवीन नसून, पूर्वीपासून रुग्ण आढळत आहेत. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास सौम्य प्रकारातील रुग्ण १५ ते ३० दिवसांत बरे होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

जीबीएस हा एक दुर्मीळ, परंतु गंभीर आजार असून, शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि काही वेळा श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते. जिल्ह्याला ‘जीबीएस’चा फारसा धोका नाही. तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

जीबीएस कुठून आला?
हा आजार शरीराच्या प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे होतो. यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा परकीय जंतूंपासून संरक्षण करण्याऐवजी स्वतःच्या मज्जातंतूंवर हल्ला करते. हा आजार पूर्वीपासून आहे.

लक्षणे काय?
गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास अडचण येणे, हात आणि पायात अशक्तपणा येणे, सतत अतिसार, स्नायू नियंत्रित करण्यास त्रास होणे, मुंग्या येणे, हालचाली मंदावणे, संतुलन बिघडणे इ. जीबीएसची लक्षणे आहेत.

मज्जातंतूवर दुष्परिणाम करतो
जीबीएसमुळे मज्जातंतू (नर्व्ह) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. मेंदूपासून शरीरभर पसरलेल्या मज्जातंतूंवर हल्ला झाल्यास संवेदनशीलता कमी होते. स्नायूंची क्रिया मंदावते आणि व्यक्ती हालचाल करण्यास असमर्थ ठरते. काही रुग्णांना दीर्घकालीन स्नायू दुर्बलता जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांच्या श्वासोच्छवासावरही परिणाम होतो. श्वास नियंत्रित करणाऱ्या स्नायूंवर परिणाम झाल्यास व्हेंटिलेटर लागते.

‘जीबीएस’ पासून वाचण्यासाठी काय कराल?
कोणत्याही संसर्गानंतर शरीरातील बदलांकडे लक्ष द्यावे. त्याकडे दुर्लक्ष नको. पाणी उकळून प्यावे. बाहेरचे पाणी, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे. हात स्वच्छ धुवा आणि संसर्गापासून बचाव करावा. अशक्तपणा, मुंग्या येणे, हालचाली मंदावणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको
जीबीएसचे रुग्ण वर्षभर आढळतात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेळेवर निदान झाले तर ९० टक्के लवकर बरे होतात. काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते. काही लक्षणे जाणवल्यास वेळीच उपचार घ्यावा. दुर्लक्ष करू नये.
- डाॅ. पांडुरंग वट्टमवार, न्यूरॉलॉजिस्ट

Web Title: GBS patient can recover in 15 days; Health system on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.