मध्यप्रदेशातून येतात मराठवाड्यात गावठी कट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:55 IST2020-11-12T12:52:52+5:302020-11-12T12:55:26+5:30
१५ ते ४० हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत होते विक्री

मध्यप्रदेशातून येतात मराठवाड्यात गावठी कट्टे
- बापू सोळुंके
औरंगाबाद : दहा दिवसांत औरंगाबाद शहरामध्ये गोळीबार घटना घडल्या. गोळीबार करण्यासाठी वापरलेले शस्त्रे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसले तरी गावठी पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या असाव्यात असा संशय अधिकाऱ्यांना आहे. मराठवाडा आणि लगतच्या नगर जिल्ह्यात मध्यप्रदेशातून तस्करी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात जालाननगर येथे तरुणावर झालेला गोळीबार आणि देवानगरीजवळील पीडब्ल्यूडी सोसायटीमध्ये बांधकाम ठेकेदारावर झाडण्यात आलेली गोळी या दोन घटनांमुळे शहरात खळबळ उडाली होती. गावठी पिस्टल अथवा कट्ट्यातून या गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा होता. औरंगाबाद शहरात आणि शेजारील नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र तस्करी होते. मध्यप्रदेशातून १५ हजार ते ४० हजार रुपये पर्यंतच्या किमतीला ही देशी कट्टे मिळतात. गावठी कट्टे कमरेला लटकवून आणि दहशत निर्माण करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक खरेदी करतात. पंधरा दिवसांपूर्वी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाचोड येथे एका अट्टल दरोडेखोराला गावठी कट्टा सह पकडले होते.
यापूर्वीही शहर पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी इमरान मेंदीला समर्थकांना गावठी कट्ट्यासह अटक केली होती. तर महिनाभरापूर्वी चिकलठाणा पोलिसांनी एका तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले.गावठी कट्टे आणि पिस्टलची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. वाळू माफिया आणि त्यांच्याकडे काम करणारे गुन्हेगार अशा प्रकारचे शस्त्रे बाळगतात. लुटमार करण्याच्या उद्देशाने दरोडेखोर गावठी कट्टे सोबत ठेवतात.
सीमकार्ड वापरून फेकून देतात
शस्त्र तस्कर गावठी पिस्टल आणि कट्ट्याची खरेदी-विक्री करताना दुसऱ्याच्या नावे सीमकार्ड खरेदी करून वापरतात आणि काम झाल्यानंतर कार्ड फेकून देतात. यामुळे बऱ्याचदा त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचत नाहीत.
दहा महिन्यांत ९ गावठी कट्टे जप्त
यावर्षी बीड येथे गावठी कट्टे नेणाऱ्या लोकाना फुलंब्री येथे पकडून त्यांच्याकडून ३ कट्टे जप्त केले होते. सिल्लोडमध्ये २, पाचोड येथे १, तर आणि चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर कारवाई करून गावठी पिस्टल जप्त केले.
खाजगी वाहनाने आणून चोरट्या मार्गाने विक्री
गावठी कट्टे मध्यप्रदेशातील सेंदवा आणि परिसरातील जंगलालगतच्या गावांतून चोरट्या मार्गाने खरेदी करून आणले जातात. मध्यप्रदेशातील काही गावांत छुप्या पद्धतीने गावठी पिस्टल आणि कट्टे तयार केले जातात. या कट्ट्यांची जळगावमार्गे ट्रॅव्हल बसमधून, तर काही लोक खाजगी वाहनाने आणून विक्री करतात. १० ते ४० हजार रुपयांपर्यंत या शस्त्रांचा दर असतो.
-भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा.