छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस माफियांच्या मुसक्या आवळल्या; १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:10 IST2026-04-03T16:09:51+5:302026-04-03T16:10:50+5:30
Chhatrapati Sambhajinagar News: राज्यातील इंधन चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्या विरोधात राज्यस्तरीय दक्षता पथकाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबत काल एक मोठी कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून, यात १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस माफियांच्या मुसक्या आवळल्या; १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त
छत्रपती संभाजीनगर - राज्यातील इंधन चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्या विरोधात राज्यस्तरीय दक्षता पथकाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबत काल एक मोठी कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून, यात १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथक प्रमुख श्री. गणेश बेल्लाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैजापूर रोडवरील हॉटेल साईयश जवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एच.पी. कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी सुरू असताना पथकाने धाड टाकली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.
जप्त केलेल्या मालाचा तपशील (एका दृष्टिक्षेपात)
- दोन टँकर: क्र. MH 43 K 5921 आणि MH 43 CK 5747 (एकूण ३५,२२० किलो गॅस).
- सिलेंडर साठा: व्यावसायिक (१९.२ किलो) आणि घरगुती (१४.२ किलो) अशा एकूण २६ सिलेंडरचा अवैध साठा.
- एकूण जप्त किंमत: अंदाजे १ कोटी २६ लाख रुपये.
या कारवाईचे गांभीर्य स्पष्ट करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेला गॅस साठा तब्बल २,४८० गरीब कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता. गॅस माफिया स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनाचा काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे.
"अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तूंची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल." - चंद्रकांत डांगे, भाप्रसे, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख