छ. संभाजीनगरात गॅससाठी रांगा थांबेनात; वितरण क्षमता १० हजार, मागणी ६० हजार सिलिंडरची
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:23 IST2026-03-23T16:22:55+5:302026-03-23T16:23:33+5:30
सावळा गोंधळ: नागरिकांची घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी धडपड

छ. संभाजीनगरात गॅससाठी रांगा थांबेनात; वितरण क्षमता १० हजार, मागणी ६० हजार सिलिंडरची
छत्रपती संभाजीनगर : आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांसह गॅसपुरवठ्यावर दोन आठवड्यांपासून संकट आहे. दररोज जेवढे घरगुती गॅस सिलिंडर वितरण केले जायचे, त्याच्या पाचपट बुकिंग दररोज होत असल्याने गॅस वितरक एजन्सीसमोरील नागरिकांच्या रांगा कमी होण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात दररोज २० हजार १३० तर शहरात सरासरी १० हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरीत होणे शक्य आहे. असे असताना रोज ६० हजार सिलिंडरची रोज मागणी होऊ लागली आहे. हा सगळा प्रकार पाहून एजन्सीधारकांसह पुरवठा विभागही चक्रावून गेले आहे.
शहरात ११ लाख ७६ हजार गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. ऑनलाइन गॅस बुकिंग सेवा सुरू असली तरी गॅस सिलिंडर केव्हा मिळणार हे निश्चित नाही. त्यामुळे कुणालाही निर्धारित वेळेत सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र दिसते आहे. इंडियन ऑइलकडे २ लाख ८३ हजार, इण्डेनकडे ४ लाख १० हजार तर बीपीसीएलकडे ४ लाख ८३ हजार सिलिंडर ग्राहक आहेत.
घरगुती गॅस सिलिंडर रिफील करण्यासाठी आवश्यक असलेला २९० टन गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यात सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २० मार्चला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत गॅस वितरकांची बैठक झाली होती परंतु गॅस पुरवठा सुरळीत झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला नसल्याचा दावा पुरवठा विभागाने केला.
जिल्ह्यात गॅस एजन्सी : ५७
शहरात गॅस एजन्सी : २०
एकूण गॅस एजन्सी : ७७
शहरातील गॅस सिलिंडर पुरवठा क्षमता दररोज : १० हजार
दररोज सिलिंडरची मागणी : ६० हजार
प्रत्येक एजन्सीवर सरासरी रोज बुकिंग : ३ हजार
व्यावसायिक गॅसबाबत निर्णयाची शक्यता
जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याबाबत राज्य सरकारचा सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत केंद्र सरकारने गॅस वितरण कंपन्यांना सूचना केल्या आहेत. हाॅटेल, उद्योग व इतर व्यावसायिक संस्थांचा गॅस पुरवठा ५ मार्चपासून बंद आहे.
अतिरिक्त बुकिंगमुळे परिणाम
प्रत्येक गॅस एजन्सीकडे ३ ते ४ हजार सिलिंडरसाठी दररोज बुकिंग होत आहे. नियमित मागणीपेक्षा ही दुप्पट आहे. ग्रामीण भागात वितरण सुरळीत सुरू आहे. शहरातील गॅस एजन्सीसमोर सध्या रांगा आहेत. रिफिलिंगसाठी लागणारा गॅस पुरवठा नियमित सुरू आहे. व्यावसायिक गॅसपुरवठा करण्याबाबत शासन स्तरावरूनच निर्णय होईल. पहिले सिलिंडर घेतल्यानंतर दुसरे २५ दिवसांनी वितरण करण्याचे धोरण सध्या आहे.
-प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी