औरंगाबादेत कचराप्रश्न पुन्हा पेटला, स्वच्छता निरीक्षकाला नागरिकांची बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 12:02 IST2018-06-27T09:47:55+5:302018-06-27T12:02:06+5:30
औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पुन्हा पेटला आहे. चिखलठाणा भागामध्ये कचऱ्याची गाडी फोडण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

औरंगाबादेत कचराप्रश्न पुन्हा पेटला, स्वच्छता निरीक्षकाला नागरिकांची बेदम मारहाण
औरंगाबाद - औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पुन्हा पेटला आहे. चिखलठाणा भागामध्ये कचऱ्याची गाडी फोडण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. तसंच नागरिकाकडून स्वच्छता निरीक्षकालाही मारहाण करण्यात आली. स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले यांना नागरिकाने बेदम मारहाण केली. चिखलठाणा भागात महानगरपालिकेच्या जागेत कचरा डेपो आहे. बुधवारी (27 जून) सकाळी येथे कचरा टाकण्यात मनपाचे कर्मचारी कचरागाडी घेऊन येथे आले. यावेळी या डेपोच्या शेजारील जमिनीचा मालक अर्जुन बकाल तेथे मद्यप्राशन करून आला.
कचरा टाकण्यास विरोध करत त्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले व त्याच्यात वाद झाले. या वादातून त्याने आठवले यांना बेदम मारहाण केली. वादाची माहिती मिळताच काही नागरिकांनी तेथे जमत कचरागाडीची तोडफोड केली. यानंतर मारहाण करणाऱ्या बकाल या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस स्थानकात जमले. प्रकरणाची माहिती मिळताच महापौर , उप महापौर यांनी पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगत पोलीस कर्मचारी आणि महापौर यांनी त्यांची समजूत काढली. यावर कर्मचारी शांत झाले व तेथून निघून गेले.