शेकडोंना वाचवणारा रुग्णवाहिका चालक स्वतःचा जीव वाचवू शकला नाही; भाच्याच्या लग्नदिवशी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:59 IST2026-02-26T13:59:07+5:302026-02-26T13:59:58+5:30
भाच्याच्या लग्नमंडपात शांतता; मामावर लग्नाच्या दिवशीच काळाचा घाला!

शेकडोंना वाचवणारा रुग्णवाहिका चालक स्वतःचा जीव वाचवू शकला नाही; भाच्याच्या लग्नदिवशी अंत
गंगापूर : ‘माझ्या भाच्याचे लग्न आहे, मला लवकर जायचे आहे,’ असे म्हणत हळदीचा उत्साह साजरा करून घरी परतलेल्या मामाचा लग्नाच्याच दिवशी पहाटे झोपेतच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे घडली. शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारे रुग्णवाहिका चालक कल्याण दगडू कलापुरे (वय ४८) यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मात्र नियतीने संधी दिली नाही.
वैजापूर तालुक्यातील वक्ती पानवी येथील भाच्याचा विवाह बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) गंगापूर येथे संपन्न होणार होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लाडक्या भाच्याच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून कल्याण कलापुरे उत्तरवाडी येथील आपल्या घरी परतले. त्यांची पत्नी आणि मुले लग्नासाठी आधीच बहिणीच्या घरी मुक्कामी असल्याने ते रात्री घरी एकटेच होते. बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत दरवाजा न उघडल्याने व आतून प्रतिसाद न मिळाल्याने, पुतण्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला व प्रवेश केला तर कल्याण हे बिछान्यावर निपचित पडलेले आढळले.
समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असलेले कल्याण कलापुरे यांनी अनेकांना वेळेत रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले होते. मात्र, बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला तेव्हा घरात कोणीच नसल्याने त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सूर्यवंशी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
लग्नाचे वऱ्हाड अंत्ययात्रेत सामील
ज्या मामाच्या स्वागतासाठी लग्नमंडपात सर्वजण वाट पाहत होते, त्याच मामाच्या निधनाची बातमी धडकताच लग्नाचे मंगलमय वातावरण क्षणात शोकाकुल झाले. सनई-चौघड्यांचा आवाज शांत झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुपारी ४ वाजता उत्तरवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे.