छत्रपती संभाजीनगरात गँगवॉर; कारागृहात वाद, ‘बाहेर’ येताच गुंडांची गुन्हेगाराला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:59 IST2025-08-02T19:59:16+5:302025-08-02T19:59:39+5:30
या मारहाण प्रकरणातील तक्रारदार आणि आरोपी सर्व कुख्यात गुन्हेगार

छत्रपती संभाजीनगरात गँगवॉर; कारागृहात वाद, ‘बाहेर’ येताच गुंडांची गुन्हेगाराला मारहाण
छत्रपती संभाजीनगर: कारागृहात सोबत असताना मोठ्या वयाच्या कुख्यात गुन्हेगारांची वैयक्तिक कामे, सेवा करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गुन्हेगारांच्या टोळीत जामिनावर सुटताच तुंबळ हाणामारी झाली. यात साईनाथ राजू गायकवाड (२२, रा. हर्षनगर) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बब्बी ऊर्फ निशिकांत राजू शिर्के (२८, रा. भावसिंगपुरा), कुणाल गायकवाड व जय ऊर्फ कमलेश गायकवाड यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गंभीर गुन्ह्यांमुळे जानेवारी २०२५ मध्ये साईनाथला एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, त्याने याविरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत तो एप्रिलमध्ये जामिनावर कारागृहाबाहेर आला. कारागृहात त्याची बब्बीसोबत ओळख झाली होती. मात्र, बब्बी दादागिरी करत त्याला त्याची वैयक्तिक कामे करण्यास सांगत होता. त्यावरून त्यांच्यात कारागृहातदेखील वाद झाले. मे महिन्यात बब्बी व अन्य आरोपीदेखील जामिनावर बाहेर आले. ३० जुलै रोजी सायंकाळी साईनाथला बब्बीने कॉल करून बोलावले. रात्री ९ वाजता ते भावसिंगपुऱ्याच्या बनकर हॉलजवळ भेटले. बब्बी, कुणाल व जय तेथेच दारू पीत बसले होते. साईनाथ तेथे जाताच बब्बीने कारागृहात काम न ऐकल्याच्या कारणावरून हल्ला चढवला. इतर दोघांनी त्याला पाण्याच्या पाइपला बांधून बेदम मारहाण केली. हे पाहून साईनाथचा मित्र अक्षय हिवराळे पळून गेला. त्यानंतर बब्बीने जखमी साईनाथला दुचाकीवर किल्लेअर्क परिसरात नेऊन सोडले.
तक्रारदार, आरोपी सर्व कुख्यात गुन्हेगार
साईनाथ व बब्बीवर यापूर्वी जवळपास ८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने दोघे एमपीडीए अंतर्गत कारागृहात होते. कुणाल व जयवरदेखील हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीयुद्धाची माहिती मिळताच छावणीचे सहायक निरीक्षक विवेक जाधव, उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी तत्काळ कुणाल व जयला अटक केली. बब्बी पसार झाला. न्यायालयाने दोघांना ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.