ओलिस ठेवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नव्याने निष्पन्न आराेपी अद्यापही मोकाटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:09 IST2025-04-26T13:09:45+5:302025-04-26T13:09:56+5:30
लोकमत इम्पॅक्ट : कसूर केल्याचा ठपका, फौजदार निलंबित

ओलिस ठेवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नव्याने निष्पन्न आराेपी अद्यापही मोकाटच
छत्रपती संभाजीनगर : सोळा वर्षीय शाळकरी मुलीचे एका महिलेने अपहरण करून तीन दिवस तिला ओलीस ठेवत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केले होते. या गुन्ह्याच्या नव्याने झालेल्या तपासात चार आरोपी निष्पन्न झाले. मात्र, अद्यापही पोलिसांना या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावता आलेला नाही.
सप्टेंबर २०२४ मध्ये या मुलीवर नाशिक व धुळ्यात पाच जणांकडून पाशवी अत्याचार करण्यात आले. यात छावणी पोलिसांनी प्राथमिक जयश्री अशोक सोनवणे (रा. संगमनेर, अहिल्यानगर) व जयपाल प्रकाश गिरासे (३५, रा. शिरपूर, जि. धुळे) यांना आरोपी केले. मात्र, पीडितेने सामूहिक अत्याचार झाल्याचे सांगूनही दुर्लक्ष करण्यात आले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या गुन्ह्याची ‘फाइल रि-ओपन’ करून नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. 'लोकमत'ने याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करून हे प्रकरण उघडकीस आणले होते.
वरिष्ठांना सूट, कनिष्ठांवर कारवाई
तपासात कसूर केल्याचा ठपका ठेवत उपनिरीक्षक नरळे यांना निलंबित करण्यात आल्याचे उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी स्पष्ट केेले. मात्र, पोक्सोच्या तपासात वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची असते. नियमाने पोक्सो गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची वरिष्ठ समितीमार्फत छाननी होते. छावणीच्या प्रकरणात हे कोणाकडूनच गांभीर्याने घेतले गेले नाही. वरिष्ठांनी यात लक्ष का घातले नाही, दोषारोपपत्रात चुका निदर्शनास का आणून दिल्या नाहीत, हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत.
आराेपी काही मिळेना
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, पीडितेवर हाजी इस्माइल अन्सारी (रा. सेंधवा, मध्य प्रदेश), शिवनाथ योगी (रा. डेगाना, राजस्थान) व हाजीच्या एक साथीदाराने अत्याचार केल्याचे नव्याने निष्पन्न झाले. मात्र, पथक त्यांचा अद्यापही तपास लावू शकलेले नाही. यापूर्वी पथक राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परत आले.