सातारा परिसरात वाळूवरून टोळीयुद्ध

By Admin | Updated: December 16, 2014 01:09 IST2014-12-16T01:01:59+5:302014-12-16T01:09:02+5:30

औरंगाबाद : वाळू व्यवसायाच्या वादातून रविवारी रात्री सातारा परिसरात दोन वाळू व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

Gang battle from the sand in Satara area | सातारा परिसरात वाळूवरून टोळीयुद्ध

सातारा परिसरात वाळूवरून टोळीयुद्ध


औरंगाबाद : वाळू व्यवसायाच्या वादातून रविवारी रात्री सातारा परिसरात दोन वाळू व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे यावेळी एका गटाचा वाळूचा ट्रकच पेटवून देण्यात आला. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. नंतर मात्र दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी देणे टाळले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण आणि सातारा परिसरातील दोन वाळू व्यावसायिकांमध्ये काल वाळू उचलण्यावरून आणि देण्याघेण्यावरून वाद सुरू होता. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील चाटे स्कूल रोडवर हे दोन्ही गट समोरासमोर आले. तेथे दोघांमध्ये पुन्हा चकमक उडाली. दोन्ही गटांत मग तुंबळ हाणामारी झाली. तोपर्यंत एका गटाने दुसऱ्या गटाचे तेथे उभे असलेले टिप्परच पेटवून दिले. या प्रकाराने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येऊन ट्रकची आग विझविण्यात आली; परंतु तोपर्यंत ट्रक खाक झाला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना ठाण्यात नेले. तेव्हा मात्र दोन्ही गटांनी तक्रार देण्यास टाळाटाळ सुरू केली.
अखेर एका गटाने पैशाच्या देवाणघेवाणीवरून आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दिली, तर दुसऱ्या गटाने अज्ञात आरोपींनी आपला ट्रक जाळल्याची तक्रार दिली. घटनास्थळी वेळीच पोलीस आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: Gang battle from the sand in Satara area