Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:41 IST2025-09-08T18:40:58+5:302025-09-08T18:41:57+5:30
फुलंब्रीत पोखरी तलावावर मुलाला वाचविले, पण पित्याचा बुडून मृत्यू

Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून
छत्रपती संभाजीनगर /फुलंब्री : पिता-पुत्र गणपती विसर्जनासाठी पोखरी तलावावर गेले होते. बाप्पाला निरोप दिल्यानंतर पोहण्यासाठी तलावात उतरले. मुलाचा पाय घसरून तो तलावात पडला. त्याला वडिलांनी वाचवले. मात्र, त्यांचाच पाय घसरून ते खोल पाण्यात बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना काढून एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सुधीर काशिनाथ मेणे (४८, रा. श्रीरामपूर, ह. मु पोखरी), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मेने हे घाटीत रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत. शनिवारी गणपती विसर्जनासाठी ११ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन ते पोखरी तलावात गेले. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर तलावात पोहण्यासाठी उतरले. मुलगा तलावाजवळ उभा होता. त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. सुधीर यांनी मुलाला तत्काळ पाण्याबाहेर काढले; पण त्याच वेळी त्यांचा पाय घसरला. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने ते पाण्यात बुडाले. रात्री उशिरा पोखरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधीर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद आधी सिडको पोलिस ठाण्यात व नंतर फुलंब्री पोलिस ठाण्यात करण्यात पोनि. संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलाश राठोड हे पुढील तपास करीत आहेत.
देगलूरात तरुणाचा बुडून मृत्यू
देगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील देगाव बु. येथे माधव पुंडलिक हनुमाने (२५) या तरुणाचा विसर्जनावेळी लेंडी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना विसर्जनावेळी सायंकाळी ७ वाजता भायेगाव रोडवर घडली. माधव हा दोन सहकाऱ्यांसोबत पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही बुडू लागले. त्यापैकी दोघांना पोहता येत असल्यामुळे ते जीव वाचवण्यात यशस्वी झाले. माधव याला पोहता येत नसल्याने तो वाहून गेला. रात्री ११ वाजता काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. माधव हनुमाने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
विसर्जनावेळी दोघे गेले वाहून
नांदेड शहरानजीक गाडेगाव शिवारात विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात उतरलेले दोन तरुण वाहून गेले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर एनडीआरफच्या पथकाने शोध घेऊन या तरुणांचा शोध लागला नव्हता. बालाजी उबाळे, योगेश उबाळे आणि शैलेश उबाळे हे विसर्जनासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघे जण पाण्यात वाहून जात होते. त्याच वेळी शैलेश उबाळे याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले, तर बालाजी आणि योगेश हे दोघे वाहून गेले.
गोदापात्रात पडलेल्या युवकाला वाचविले
शनिवारी रात्री विसर्जन सुरू असताना जुने कायगावच्या गोदावरी नदीच्या नवीन पुलावरून एक भक्त पाय घसरून पडला. स्थानिक जीवनरक्षक दलाचे सदस्य, गंगापूर न.प.च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचे प्राण वाचविले. गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथून आलेल्या कैलास पोपट खेडकर यांचा पाय घसरून ते गोदापात्रात पडले. स्थानिक जीवनरक्षक दलाचे सदस्य, गंगापूर नगर परिषदेची बोट, प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचाऱ्यांनी बोट त्या दिशेने तातडीने नेली. अंधारात बॅटरीच्या मदतीने सदर व्यक्तीला सुखरूप पाण्याबाहेर काढले.