'आता टाकी करा फुल!'; छ. संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग रद्द, अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:51 IST2026-03-27T15:46:48+5:302026-03-27T15:51:19+5:30
अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

'आता टाकी करा फुल!'; छ. संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग रद्द, अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पुन्हा पूर्वपदावर आली आहे. यामुळे प्रशासनाने २५ मार्च रोजी इंधन विक्रीवर घातलेले सर्व निर्बंध शुक्रवारी (२७ मार्च) तातडीने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निर्बंधांची आता आवश्यकता नाही
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे मागणी आणि पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला होता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी इंधन मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल कंपन्यांकडून मुबलक साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे २५ मार्चचा आदेश तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात आला आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, इंधन साठा मुबलक असून तो खंडित झालेला नाही. "नागरिकांनी चिंता करू नये, इंधनाची टंचाई होणार नाही आणि भाववाढ देखील होणार नाही. केवळ अफवांमुळे पंपांवर गर्दी करू नका," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवून गोंधळ निर्माण करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.