'साध्या पेट्रोलला दिलासा, पण प्रिमियमचा 'स्पीड' वाढला!'; पहा छ. संभाजीनगरमधील इंधनाचे नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:45 IST2026-03-21T12:40:35+5:302026-03-21T12:45:01+5:30
पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन माहिती; आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमुळे 'पॉवर' पेट्रोलचे दर भडकले

'साध्या पेट्रोलला दिलासा, पण प्रिमियमचा 'स्पीड' वाढला!'; पहा छ. संभाजीनगरमधील इंधनाचे नवे दर
छत्रपती संभाजीनगर : पश्चिम आशियातील इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी प्रिमियम पेट्रोलच्या दरात वाढ केली. २० मार्चपासून ही दरवाढ लागू झाली असून, लिटरमागे १ रु. ९९ पैसे ते २ रुपये ८ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली.
या दरवाढीचा परिणाम प्रमुख प्रिमियम इंधनांवर झाला आहे. भारत पेट्रोलियमचे ‘स्पीड’, हिंदुस्तान पेट्रोलियमचे ‘पॉवर’ आणि इंडियन ऑइलचे ‘एक्सपी-९५’ या प्रिमियम पेट्रोल प्रकारांच्या किमती वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती यामुळे इंधन दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम प्रिमियम पेट्रोलच्या दरवाढीतून दिसत आहे.
सामान्य पेट्रोलच्या तुलनेत प्रिमियम पेट्रोल आधीच महाग असल्याने ही वाढ ग्राहकांसाठी आर्थिक ताण वाढवणारी ठरत आहे. सर्वसामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली.
१० ते १५ टक्केच वाहनधारक घेतात प्रिमियम पेट्रोल
एकूण पेट्रोल विक्रीच्या अवघी १० ते १५ टक्के विक्री प्रिमियम पेट्रोलची होते. पण बहुतांश वाहनधारक साधे पेट्रोल खरेदी करतात.
- बर्झिन पेंटर, मालक, पेट्रोलपंप.
कोणत्या पेट्रोलियम कंपनीच्या प्रिमियम पेट्रोलमध्ये दरवाढ?
कंपनीचे नाव पेट्रोल १९ मार्च (प्रतिलिटर) २० मार्च----- किती वाढ?
भारत पेट्रोलियम --- स्पीड -- ११२.२० रु. -- ११४.२९ रु. ------२.०९ रु.
हिंदुस्तान पेट्रोलियम-- पॉवर ९५-- ११२.९१--- ११४.९०-----१.९९
इंडियन ऑइल--एक्सपी-९५---११२.१३---११४.२१ --------१.२८