ॲडव्हान्स न भरणाऱ्या पेट्रोल पंपचालकांमुळे वाहनधारकांना रांगेत उभे राहण्याची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:42 IST2026-03-26T13:40:20+5:302026-03-26T13:42:06+5:30
ऑइल कंपन्यांची नवी अट; पैसे भरल्याशिवाय पेट्रोलचा टँकर निघणार नाही.

ॲडव्हान्स न भरणाऱ्या पेट्रोल पंपचालकांमुळे वाहनधारकांना रांगेत उभे राहण्याची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑइल कंपन्यांनी ॲडव्हान्स पेमेंटची अट लागू केल्यानंतर शहरातील पेट्रोल पंपचालकांचा कारभार उघडा पडला आहे. वर्षानुवर्षे उशिरा पेमेंट करण्याची सवय असलेल्या पंपचालकांना आता ॲडव्हान्स रक्कम भरणे कठीण जात असल्याने अनेक पंप बुधवारी ‘ड्राय’ झाले होते. मात्र, या ढिसाळ नियोजनाचा थेट फटका वाहनधारकांना बसत आहे.
पेट्रोल पंपांवर पेट्रोल नसल्याने व काही पंपांवर पाट्या लागल्याने वाहनधारकांनी लगेच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लावल्या. वाहनधारकांकडून रोख रक्कम घेणारे पेट्रोलपंपचालक मात्र, ऑइल कंपन्यांना ॲडव्हान्स पेमेंट करीत नाहीत आणि पेट्रोल मिळाले नाही, तर हेच पेट्रोल पंपचालक ‘पेट्रोल संपल्या’चा फलक लावून जनतेला ताण देण्याचे काम करीत असल्याचे सत्य उजेडात आले.
ज्या पेट्रोल पंपचालकांनी ॲडव्हान्स भरला, त्या पंपावर नियमित पेट्रोल पुरवठा सुरू होता. पण, अन्य पेट्रोल पंप बंद असल्याने जिथे पेट्रोल आहे, त्या पंपांवर वाहनधारकांनी मोठी रांग लावली. ही रांग रात्री उशिरापर्यंत होती.
बीड बायपासहून सुरुवात
पेट्रोल पंप ‘ड्राय’ होण्याची सुरुवात सर्वप्रथम बीड बायपास येथून झाली. एकापाठोपाठ ३ पेट्रोल पंपांवरील टाक्या रिकाम्या झाल्या. त्यानंतर काल्डा कॉर्नर, जुना जकात नाका येथील महापालिकेचे पेट्रोल पंप बंद पडले. टंचाईच्या अफवा पसरताच काही पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या. उकाड्यात नागरिकांना ताटकळावे लागले.
साठा आहे तरी त्रास
पानेवाडी येथील डेपोत पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही केवळ पेमेंटच्या वादामुळे पुरवठा ठप्प झाला आहे.
-प्रीतम जाधव, वाहनधारक, शिवाजीनगर
वेठीस धरण्याचा प्रकार
पंपचालकांनी वेळेत व्यवहार पूर्ण न करता ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.
-रमेश भालेराव, वाहनधारक, उल्कानगरी
उद्या सकाळी टँकर येईल
आम्हाला काही कारणास्तव पैसे भरण्यास उशीर झाला. यामुळे आमच्या पेट्रोल पंपावर स्टॉक संपला. पण, आम्ही लगेच ॲडव्हान्स रक्कम भरली. गुरुवारी सकाळी टँकर येईल.
स्वप्नील पाटील, व्यवस्थापक, प्रगती पेट्रोल पंप (मनपा)
बैठक घेण्याचे ऑइल कंपन्यांना आवाहन
ऑइल कंपन्यांनी पेमेंटची पद्धती बदलली आहे. आधी पेमेंट नंतर पेट्रोल, असे धोरण अवलंबले आहे. त्यात एकाच वेळीस सर्व पेट्रोल पंपचालकांनी पैसे भरल्याने डेपोतून पेट्रोल भरून निघायला टँकरला उशीर होत आहे. यामुळे शहरात काही पेट्रोल पंप बंद पडले. पण, गुरुवारी पेट्रोल दाखल होईल. वाद सोडविण्यासाठी बैठक घेण्याचे आवाहन करणारा ‘मेल’ आम्ही ऑइल कंपन्यांना पाठविला आहे.
-अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन