फळबाग विम्यातही बोगसगिरी; ३० टक्के शेतकऱ्यांचे विमा अर्ज अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 20:03 IST2025-03-19T20:01:57+5:302025-03-19T20:03:23+5:30

फळबाग विमा योजनेत सर्वाधिक बोगसगिरी जालना जिल्ह्यात झाली आहे.

Fraud in orchard insurance too; Insurance applications of 30 % farmers ineligible | फळबाग विम्यातही बोगसगिरी; ३० टक्के शेतकऱ्यांचे विमा अर्ज अपात्र

फळबाग विम्यातही बोगसगिरी; ३० टक्के शेतकऱ्यांचे विमा अर्ज अपात्र

- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर :
लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १ रुपयांत पीक विमा योजना आणली. या योजनेतील बोगस विमा घोटाळा गतवर्षी उघडकीस आल्यानंतर फळबाग विम्यातील बनवेगिरी आता समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील एकूण फळबाग विमा अर्जांच्या ३० टक्के अर्ज बोगस असल्याचे आढळून आले. कृषी विभाग आणि विमा कंपनीने विभागातील १२ हजार ३१५ बोगस फळबागधारकांचे विमा अर्ज अपात्र ठरविले आहेत. यात सर्वाधिक अपात्र शेतकरी जालना जिल्ह्यातील आहेत.

२०२३ पासून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला जातो. एक रुपयात पीकविमा मिळत असल्याचे पाहून अनेक जिल्ह्यांत बोगस पीकविमा काढून आपले उखळ पांढरे करुन घेण्याचा प्रयत्न केला हाेता. सीएससी सेंटर चालकाला हाताशी धरुन सरकारी मालकीच्या शेकडो एकर जमिनीवर पीक पेरल्याचा बोगस विमा काढण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. शासनाने फळबाग विम्यासाठी एक रुपयांत विम्याची योजना लागू केलेली नाही. यामुळे फळबागेचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता कंपनीकडे भरावा लागतो.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ बागायतदार शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागेचा मृगबहारासाठी विमा उतरविला होता. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १८ हजार ९२२ फळबाग विम्याचे अर्ज विमा कंपनीला मिळाले होते. बीड जिल्ह्यातील ३ हजार ४२३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज होते. या अर्जांची विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संयुक्त पडताळणी केली. तेव्हा अनेक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अस्तित्वात नसलेल्या फळबागेचा विमा उतरविल्याचे दिसून आले. तर काहींनी त्यांच्या शेतातील फळबागेपेक्षा दुप्पट, तीनपट क्षेत्राचा विमा उतरविला. काहींनी दुसऱ्यांच्या जमिनीवरील बागेचा विमा काढल्याचे दिसून आले.

जालना जिल्ह्यात सर्वाधिक बोगसगिरी
फळबाग विमा योजनेत सर्वाधिक बोगसगिरी जालना जिल्ह्यात झाली आहे. जालना जिल्ह्यातील ७९२५ शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आले. माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ विमा अर्जापैकी ४ हजार ३३ अर्ज अपात्र ठरले आहेत. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील ३५७ शेतकऱ्यांनी फळबाग विम्यात ही बनवेगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Fraud in orchard insurance too; Insurance applications of 30 % farmers ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.