विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद, टोळीच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:34 IST2025-10-29T19:34:48+5:302025-10-29T19:34:50+5:30
सहा आरोपींना अटक, कुटुंबातील एकाची प्रकृती चिंताजनक

विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद, टोळीच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी
वाळूज महानगर : विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद होऊन सहा जणांच्या टोळीने चढविलेल्या हल्ल्यात लग्नाळू नवरदेवासह कुटुंबातील चौघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या हल्ल्यात दिनेश विठ्ठल इळतवार (२८ ) त्याचा भाऊ सुनील, तसेच आई-वडील (रा. सर्व वैष्णवी पार्क, नेहरूनगर, रांजणगाव) गंभीर जखमी झाले. सुनीलची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी दवाखान्यात हलविले.
दिनेश इळतवार यांच्या फिर्यादीनुसार, त्याच गल्लीत राहणारी वंदना बोराडे या परिचित महिलेने लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगून मे २०२५ मध्ये त्यांच्याकडून ३.५० लाख रुपये घेतले; परंतु लग्न जुळवलेच नाही. पैसे परत देण्यासही टाळाटाळ करत होती. २ महिन्यांपूर्वी तिने दीड लाख रुपये परत दिले. मात्र, दोन लाख रुपये देण्यास नकार दिला. दिनेशसह कुटुंब रविवारी रात्री वंदनाच्या घरी गेले. तेव्हा तिने “आता पैसे नाहीत” असे सांगत वाद घातला. तिच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी तलवार, लोखंडी रॉड, झारी व दगडांनी दिनेश व त्याच्या कुटुंबावर हल्ला चढविला. ‘या सर्वांना संपवून टाका’ असे म्हणत जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी त्यांना जातिवाचक शिवीगाळही केली. जखमी अवस्थेत दिनेशने पळ काढून हरिओमनगरातील बहिणीचे घर गाठले. तेथून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नेऊन नंतर घाटीत दाखल केले.
परस्परविरोधी तक्रार
सागर अविनाश साळुंके (१८, रा. नेहरूनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री ८:३० वाजता शुभम बोराडे आणि काही व्यक्तींमध्ये पैशाच्या वादातून भांडण सुरू होते. हे पाहण्यासाठी गेलेल्या सागर व त्याचा मित्र दानिश कुरेशीला सुनील, दिनेश, रुख्मिणी व इतरांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. यात सागर, दानिश, पवन कदम आणि मोईन हे चौघे जखमी झाले. याप्रकरणी सागरने संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी तत्पर कारवाई करत सागर साळुंके, दानिश कुरेशी, मोईन सिकंदर शेख, शुभम पवार, पवन कदम आणि वंदना बोराडे यांना अटक केली. जिवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.