अपघातात आणखी किती बळी जाणार? नगरनाका ते दौलताबाद टी पाईंटपर्यंत चौपदरीकरण रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:17 IST2025-10-27T16:16:09+5:302025-10-27T16:17:17+5:30
नगरनाका ते छावणीतील एक ते दीड कि.मी.ची हद्द वगळता हा संपूर्ण रस्ता चौपदरी असेल.

अपघातात आणखी किती बळी जाणार? नगरनाका ते दौलताबाद टी पाईंटपर्यंत चौपदरीकरण रखडले
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील नगरनाकामार्गे छावणी ते पडेगाव, मिटामिटा, शरणापूर-वंजारवाडी फाटामार्गे पुढे दौलताबाद टी पॉईंटपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम २०० कोटींतून करण्यासाठी सहा महिन्यांपुर्वी निर्णय घेतला. जुलै महिन्यात मनपाने रूंदीकरण मोहीम हाती घेतल्यानंतर आठ दिवसांत त्या रस्त्याच्या कामाचे कार्यादेश निश्चित होऊन कामाला सुरुवात होण्याचा दावा करण्यात आला. मात्र, मनपा आणि बांधकाम विभागातील संयुक्त निर्णयाअभावी हे काम लांबले आहे. परिणामी, त्या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे.
शनिवारी माने दाम्पत्याचा त्या अरूंद रस्त्याने बळी घेतल्यानंतर रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम केव्हा सुरू होणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका हद्दीतील हा महत्त्वाचा रस्ता आहे. शरणापूरमार्गे वंजारवाडी सहजतपूर ते करोडी येथे सोलापूर-धुळे महामार्गाला या रस्त्यावरून कनेक्टिव्हिटी मिळेल. दौलताबाद टी पॉईंटपासून पुढे समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी मिळेल. वेरूळ लेण्यांकडे, भद्रा मारुतीसह ऐतिहासिक स्थळांकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. सफारी पार्क झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण महत्त्वाचे आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात यलो झोनमधील अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्या नागरिकांना सध्याच्या अरुंद रस्त्याने ये-जा करणे खूप धोकादायक झाले आहे.
किती कि.मी. अंतराचे काम?
साधारणत: ९ कि.मी. अंतराचे काम बांधकाम विभाग करणार आहे. नगरनाका ते छावणीतील एक ते दीड कि.मी.ची हद्द वगळता हा संपूर्ण रस्ता चौपदरी असेल. छावणी हद्दीत तीनपदरी असेल. तसेच मनपाच्या नवीन आराखड्यातील कामांचा यात अंतर्भाव असेल.
२०० कोटींचे कंत्राट
२०० कोटींचे हे कंत्राट असून, जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या संस्थेकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. १८ महिने कामाची मुदत असेल. छावणी हद्दीत पूर्ण रस्ता १० मीटर म्हणजेच ३० फूट रुंदीचा असेल, तर उर्वरित ७.५ कि.मी. रस्ता हा दुभाजकासह ६० फुटांचा असेल. दोन्ही बाजूंनी ५ मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे. आता यात काही बदल झाले आहेत.
आठ ते दहा दिवसांत काम सुरू होईल
जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चरला काम दिले असून, ८ ते १० दिवसांत रस्त्याचे काम सुरू होईल. महापालिकेने नव्याने रस्त्यासाठी केलेल्या आराखड्यात पडेगाव रोडवर अंडरपासची तरतूद केली आहे. त्यामुळे कामात बदल करून ते सुरू केले जाईल. मनपा आणि बांधकाम विभागाची संयुक्त बैठक होऊन काम सुरू होणार आहे.
- एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग