छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर शोककळा; एकाच दिवशी चार अपघातात पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:28 IST2025-02-19T15:27:03+5:302025-02-19T15:28:24+5:30

मंगळवार ठरला अपघात वार; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी चार अपघात

Four accidents at four places in Chhatrapati Sambhajinagar district on the same day; Five people died | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर शोककळा; एकाच दिवशी चार अपघातात पाच जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर शोककळा; एकाच दिवशी चार अपघातात पाच जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील दोन, कन्नड मधील एक तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका अशा वेगवेगळ्या चार अपघातात पाच व्यक्तींचा मृत्यू मंगळवारी झाला. 

बनशेंद्रा येथे टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे ठार
कन्नड : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार झाले. हा अपघात कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान घडला. संतोष महादू मोरे (वय २६) व कैलास दगडू वानखेडे (३०, दोघे रा. भोईवाडा नरसिंहपूर) अशी मयतांची नावे आहेत. भोईवाडा येथील संतोष मोरे व कैलास वानखेडे हे दोघे चापानेरकडून कन्नडला दुचाकी (क्र. एमएच २० जीएस ०२०४)ने मंगळवारी सायंकाळी निघाले होते. दरम्यान, बनशेंद्रा येथे कन्नडकडून वैजापूरकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच ४१ एयू. ५८७७)ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीचा चक्काचूर होऊन टेम्पोही पलटला. या अपघातात मोरे व वानखेडे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाइकांनी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत घोषित केले. मयत संतोष मोरे यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, तीन बहिणी, असा परिवार आहे. तर कैलास वानखेडे यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन भाऊ, असा परिवार आहे.

पिरबावडा शिवारात कारने दोन दुचाकींना उडवले, एक जागीच ठार
फुलंब्री : फुलंब्री ते राजूर महामार्गावर पिरबावडा शिवारात भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीला उडविले. यात एकजणाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. अशोक गुलाबराव साळुंके (वय ४५, रा. कोलते पिंपळगाव, ता. भोकरदन) असे मृताचे नाव आहे. कोलते पिंपळगाव येथील अशोक साळुंके दुचाकी (एमएच २०, जीव्ही ०४०७)ने गावी जात होते. दरम्यान, राजूरकडून भरधाव वेगात आलेल्या कार (एमएच ०२, सीव्ही ८७३१)ने त्यांच्या दुचाकीसह आणखी एका दुचाकीला पिरबावडा शिवारात जोराची धडक दिली. अपघात एवढा भयानक होता की, अशोक यांच्या मेंदूचे तुकडे होऊन रस्त्यावर पसरले होते. अपघातानंतर कारमधील चालकासह इतरांनी कार तेथेच सोडून पोबारा केला. वडोद बाजार पोलिसांनी मयतासह जखमीला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जखमीला (नाव माहीत नाही) छ. संभाजीनगरला हलविले. अपघातस्थळी वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

दोन दुचाकीची धडक, एकजण ठार; झोलेगाव पाटी येथील घटना
गारज : छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील झोलेगाव पाटी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. गणपत म्हसू पिंगळे (वय ५१, रा. मनेगाव, ता .वैजापूर असे मयताचे नाव आहे. पिंगळे हे मंगळवारी दुपारी तुरी विकण्यासाठी लासूर स्टेशन येथे गेले होते. तुरी विकून ते सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकीने मनेगावकडे येत होते. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील झोलेगाव पाटीजवळ अन्य एक दुचाकी एमएच २० बीडी ९८०७ आली. या ठिकाणी या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात पिंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील राजस्थान येथील दोन बांधकाम मजूर गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिऊर ठाण्याचे बिट जमादार गणेश गोरक्ष, संभाजी आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर गणपत पिंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. पिंगळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू; आडगाव बुद्रुक येथील घटना
फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील बसस्थानकाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. भागीनाथ यमाजी मगरे (वय ५०, रा. आडगाव बुद्रुक, ता. फुलंब्री) असे मृताचे नाव आहे. मगरे मंगळवारी रात्री ८ वाजेदरम्यान शेताकडून गावाकडे पायी येत होते. याचवेळी फुलंब्रीकडून निधोनाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात मगरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक वाहनासह पळवून गेला. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: Four accidents at four places in Chhatrapati Sambhajinagar district on the same day; Five people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.