अजिंठा बॅक गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार सुभाष झांबड यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:25 IST2025-02-07T16:24:03+5:302025-02-07T16:25:02+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाने देखील झांबड यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता.

Former MLA Subhash Zhambad surrenders in Ajanta Bank fraud case | अजिंठा बॅक गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार सुभाष झांबड यांचे आत्मसमर्पण

अजिंठा बॅक गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार सुभाष झांबड यांचे आत्मसमर्पण

छत्रपती संभाजीनगरअजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी आज सकाळी पोलिस आयुक्तालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. झांबड यांनी अटकपूर्व जामीन मिळवा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाने देखील झांबड यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. परिणामी झांबड यांच्यासमोरील सुटकेचे सर्व दरवाजे बंद झाल्याने ते शुक्रवारी सकाळी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले.

माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बॅँकेचे अध्यक्ष आहेत. बॅकेमधील ९८ कोटी ४८ लाख व २१ कोटी रूपयाच्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सीटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर २०२३ मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर २०२४ मध्ये नोंदवण्यात आला होता. दरम्यान, पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. येथे देखील त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर झांबड स्वतःहून आज सकाळी पोलिस आयुक्तालयात हजर झाले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

१२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, मोसिन सय्यद यांनी माजी आमदार झांबड यांना दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले. जवळपास २० मिनिट चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत झांबड यांना १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्रशासकांनी केली होती तक्रार
अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २ ऑगस्ट रोजी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीईओ प्रदीप कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रशासकांना बँकेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सीआरएआर (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक, तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळून आले. बेकायदा कर्ज वाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल या मुद्यांवरून प्रशासकांनी तक्रार दाखल केली होती.

यांना यापूर्वी अटक 
सोपान गोविंदराव डमाळे (६२, रा. जवाहर कॉलनी), मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ (५०, रा. बेगमपुरा), तत्कालीन शाखा व्यवस्थापक कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे (५०, शहानूरवाडी), प्रशांत भास्कर फळेगावकर (५६, रा. देवानगरी), राजू सावळाराम बाचकर (४६, रा. सदानंदनगर), पोपट बाजीराव साखरे (५३, रा. एन-२), ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार (३५, रा. शिवशंकर कॉलनी), गणेश आसाराम दांगोडे (३७, रा. म्हाडा कॉलनी).

Web Title: Former MLA Subhash Zhambad surrenders in Ajanta Bank fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.