अपघातानंतर मदत करणाऱ्या माजी नगरसेवकाला धक्काबुक्की; रिक्षामालकाच्या मुलाला बेदम चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:19 IST2025-12-18T15:18:43+5:302025-12-18T15:19:05+5:30
सूतगिरणी चौक- शहानूरमियाँ दर्गा रस्त्यावर घटना : मद्यधुंद रिक्षा मालकाच्या मुलामुळे तणाव; विरोधी गटाकडून मारहाण

अपघातानंतर मदत करणाऱ्या माजी नगरसेवकाला धक्काबुक्की; रिक्षामालकाच्या मुलाला बेदम चोप
छत्रपती संभाजीनगर : सुसाट वेगात जाणाऱ्या रिक्षा व कारचा अपघात झाल्यानंतर जखमींच्या मदतीसाठी धावलेल्या एका माजी नगरसेवकाला रिक्षा मालकाच्या मुलाने अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न केला. गैरसमजातून घडलेल्या प्रकारात वाद वाढून माजी नगरसेवकासह दोन ते चार जणांच्या गटाने तरुणाला बेदम चोप दिला. बुधवारी रात्री ११ वाजता सूतगिरणी चौक ते शहानूरमियाँ दर्गा रस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला.
पोलिस व प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुसाट रिक्षा व कारचा अपघात झाला. त्याच वेळी एक माजी नगरसेवक तिथून जात होते. अपघातात रिक्षा उलटली. माजी नगरसेवकाने सहकाऱ्यांसह धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. जखमींना रस्त्याच्या बाजूला बसवले. रिक्षामालकाचा मुलगा जवळच्याच परिसरात होता. त्यानेही तिथे धाव घेतली. रिक्षाचालक व तोही नशेत होता. तो अचानक माजी नगरसेवकावर धावून गेला. त्यातून गैरसमज वाढून मोठा जमाव जमला. माजी नगरसेवकाच्या मुलांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. वाद चिघळून त्यांनी रिक्षामालकाच्या मुलाला बेदम चोप देण्यास सुरुवात केली.
मोठा जमाव, पोलिसांची धाव
या घटनेमुळे मोठा जमाव जमला. माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवाहरनगर पोलिसांनी येऊन रिक्षा मालकाच्या मुलाची सुटका करत त्यास वाहनात बसवले तरीही त्याला मारहाण सुरूच होती. घटनेनंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यात हजर झाले. सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार हे ठाण्यात आले. राजकीय पदाधिकाऱ्यांचा वाद झाल्याचे कळताच दिलीप थोरात, राजेंद्र जंजाळ हेही आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटना समजून घेत दोन्ही गटांसोबत चर्चा करत होते. घटनेतील तथ्य समजून वरिष्ठांच्या सूचनेवरून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकार यांनी स्पष्ट केले.