विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत; अब्दुल सत्तार, अंबादास दानवे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 06:05 IST2021-03-23T02:52:16+5:302021-03-23T06:05:45+5:30
सतीश चव्हाण व अंबादास दानवे यांनी प्रथमच बँकेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना यश आले; परंतु ज्यांच्या नावाने पॅनल ओळखले जात होते ते बागडे मात्र पराभूत झाले

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत; अब्दुल सत्तार, अंबादास दानवे विजयी
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक व विधानसभेचे माजी सभापती, तसेच फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. बागडे हेच शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते होते, तेच पडले. या पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाल्यामुळे ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले रोहयोमंत्री संदीपान भुमरे व प्रोसेसिंग मतदारसंघातून निवडून आलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही ‘गड आला, पण सिंह गेला’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बिगर शेती मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे विद्यमान चेअरमन नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण व आमदार अंबादास दानवे हे निवडून आले. सतीश चव्हाण व अंबादास दानवे यांनी प्रथमच बँकेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना यश आले; परंतु ज्यांच्या नावाने पॅनल ओळखले जात होते ते बागडे मात्र पराभूत झाले. शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे जगन्नाथ काळे व अपक्ष अभिषेक जैस्वाल यांनी या बिगर शेती मतदारसंघातून बाजी मारली.