‘भांडणं’ विसरा,‘आघाडी-युती’ मैत्रीशी करा! निवडणुकीचा संपताच ‘प्रेम-शांती’चे मेसेज व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:55 IST2025-12-04T15:54:02+5:302025-12-04T15:55:01+5:30
नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून विविध पक्षांसह अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांना मोठा जोर चढला होता.

‘भांडणं’ विसरा,‘आघाडी-युती’ मैत्रीशी करा! निवडणुकीचा संपताच ‘प्रेम-शांती’चे मेसेज व्हायरल!
- जयेश निरपळ
गंगापूर : नगरपालिका निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमांवर निवडणूक प्रचाराचा ज्वर जोरात होता. आता निवडणूक संपल्यानंतरच्या संदेशांना पूर आला असून ‘आमचा नेता लय भारी, विजयानंतर घेईल भरारी’ यासह निवडणुकीचा ताप आवरण्याची आवाहने होऊ लागली आहेत. ‘संपले इलेक्शन, जपा रिलेशन’ असे प्रेमाचे संदेश मोबाइलवर पोहोचू लागले आहेत.
नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून विविध पक्षांसह अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांना मोठा जोर चढला होता. आपल्या नेत्याचे कौतुक करण्यापासून वैयक्तिक टीकेपर्यंत तसेच इतरांचे जमेल तसे वाभाडे काढण्यापर्यंत सगळे प्रकार या काळात झाले. निवडणूक संपल्यानंतरही हा प्रकार कमी झालेला नाही. राजकीय भांडणे थांबविण्याच्या आवाहनापासून ते निवडणूक अंदाजांपर्यंत सगळ्या विषयांचे संदेश आता समाजमाध्यमावर जागा व्यापू लागले आहेत. प्रचाराच्या काळात दिसलेला टीकेचा सूर आणि कडवटपणा मागे ठेवा. निवडणूक संपली आता मैत्रीच्या पक्षात या कारण गेल्या एक महिन्यापासून मित्रांसोबत बंडखोरी झाली होती. आता मित्रांशी आघाडी युती व हेच आपले मैत्रीच राजकारण होय. ‘भांडणं’ विसरा, ‘आघाडी-युती’ मैत्रीशी करा, जिंकला-हरला विसरा! ‘निवडणूक ज्वर’ उतरवून, आता ‘दोस्तीचा डोळा’ मारा! असा सामाजिक व तितकाच प्रबोधनात्मक संदेश समाजमाध्यमांवर निवडणुकीनंतर व्हायरल होत आहे. निवडणुकीतील विरोध राजकीय होता, व्यक्तिगत नाही. कोणाचे मन दुखावले असेल तर माफी असावी. कारण राजकारण निवडणुकांपुरते असते व मैत्री ही आयुष्यभर साथ देणारी असते, चला, पुन्हा मैत्रीच्या पक्षात प्रवेश करूयात, असे आवाहन करणारे तसेच ‘प्रचार संपला, विरोध संपला’ हे संदेश फिरू लागले आहेत.
कट्टर कार्यकर्ते पक्षीय अभिनिवेशावर कायम
कालपर्यंत विविध पक्ष आणि उमेदवारांचे गुणगान करणाऱ्या संदेशांनी ग्रुप भरभरून वाहत होते. मंगळवार सायंकाळीपासून त्यांची जागा समजूतदारीच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाणाऱ्या आवाहनांनी घेतल्याचे चित्र समाजमाध्यमांवर दिसले तर अनेक कट्टर कार्यकर्ते मात्र अजूनही पक्षीय अभिनिवेश कवटाळून बसल्याचे दिसून आले.