वनविभाग बुद्धपौर्णिमेची संधी साधणार, गौताळा अभयारण्यात करणार प्राणिगणना
By साहेबराव हिवराळे | Updated: May 23, 2024 19:34 IST2024-05-23T19:32:41+5:302024-05-23T19:34:26+5:30
गौताळा अभयारण्यातील १८ पाणवठ्यांवर प्राणिगणना केली जाणार आहे.

वनविभाग बुद्धपौर्णिमेची संधी साधणार, गौताळा अभयारण्यात करणार प्राणिगणना
छत्रपती संभाजीनगर : बुद्धपौर्णिमेला दि. २३ मे रोजी वनविभागाच्या वतीने गौताळा अभयारण्यात १८ पाणवठ्यांवर प्राणिगणना होणार आहे. हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने यंदाही प्राणी गणना केली जाणार आहे. या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी वनविभाग, वन्यजीव विभागातर्फे गौताळा अभयारण्यात प्राणिगणना केली जाणार आहे. सकाळी बिबट्यासह सर्वच प्राणिगणना केल्याची माहिती मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राणिगणनेच्या अनुषंगाने तयारी वनविभाग, वन्यजीव विभाग, तसेच तज्ज्ञ मंडळींसोबत बैठक पार पडली. यानुसार, २३ रोजी गौताळा अभयारण्यातील १८ पाणवठ्यांवर प्राणिगणना केली जाणार आहे. गौताळ्यात कन्नड आणि नागद ही दोन परिक्षेत्रे आहेत. यातील एकूण १८ पाणवठ्यांवर ही गणना होईल. यासाठी मचाण बांधण्यात येईल, त्यावर प्रत्येकी दोन जण बसू शकतील. यात एक वनखात्याचा तर दुसरा हौशी असे दोन जण बसू शकतील. रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना या निमित्ताने होईल. मुख्य वनसंरक्षक हनुमंत धुमाळ, उप वनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम गणना करणार आहे, असे वन परिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.
प्राण्यांना अडथळा नको, काळजी घ्यावी
यासोबतच पाटणादेवी येथील १० पाणवठ्यांवरही गणना केली जाणार आहे. प्राणिगणना उपक्रमाला येणाऱ्यांनी फिके रंगाचे कपडे घालावे, जोरजोरात बोलू नये, खाण्यापिण्याचे साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन मानद वन्यजीव सदस्य डॉ.किशोर पाठक यांनी केले आहे.