वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:14 IST2025-06-06T16:13:59+5:302025-06-06T16:14:35+5:30
जागतिक पर्यावरण दिन:या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे.

वन विभाग व इको बटालियनने १,०८० हेक्टरवरील ओसाड माळरानावर फुलवले नंदनवन
छत्रपती संभाजीनगर: "झाडे लावा, झाडे जगवा", "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" अशा घोषवाक्यांमधून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, अनेकदा केवळ औपचारिकतेपुरतेच हे उपक्रम मर्यादित राहतात. याला अपवाद ठरली आहे ‘इको बटालियन’. निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक जबाबदार संघटना, जिने गेल्या सात वर्षांत झाडे लावण्याचे केवळ नारे न देता, प्रत्यक्ष कृतीद्वारे डोंगर-दऱ्यांत, माळरानावर हिरवळ फुलवली आहे.
इको बटालियनने वन विभागाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगरमधील ओसाड माळरानावर तब्बल १,०८० हेक्टर क्षेत्रावर १७ लाख २ हजार ८५५ वृक्षांची लागवड केली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. शेंद्र बन, सिरसमाळ, कोलठाण, कुबेर गेवराई अशा अनेक भागांमध्ये ही हिरवळ फुलवली आहे. या हरित उपक्रमामुळे डोंगरांवरील वनसंपदा पुन्हा बहरू लागली आहे. अतिक्रमण आणि झाडतोडीला आळा बसला असून, आज त्या भागात हरण, काळवीट, नीलगाय, मोर, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त वावर वाढत आहे. त्यामुळे या भागातील पर्यावरणीय समतोल पुन्हा प्रस्थापित होत आहे.
यंदा जटवाडा, रहाळपट्टी तांड्यात लावणार १ लाख वृक्ष
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको बटालियनने एक लाख नव्या वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा व रहाळपट्टी तांडा येथील ९० हेक्टर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात इको बटालियनचे अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन सहभागी होणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.
प्लॅस्टिक प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्न
वनसंवर्धनासाठी समर्पित प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले असून, इतरांसाठी हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरू शकते. यासह अनेक प्रस्तावित प्रकल्प या कंपनीला वनविभागाने सोपवले आहे. त्याचा फायदा वृक्षारोपण आणि संगोपनासाठी उपयुक्त ठरणार आहे. एक झाड एका व्यक्तीने लावलेच पाहिजे, असा नारा दिला आहे. पर्यावरणाची थीम प्लॅस्टिक निर्मूलन आहे. प्लॅस्टिकने जमीन नापीक होत आहे. शासनानेही विरोधी अभियान राबविलेले आहे. परंतु, आज प्रत्येक जण प्लॅस्टिक वापर करताना दिसत आहे.