स्वायत्तेसाठी नागपूर मेडिकल,‘जेजे’,‘ससून’चा विचार, मग छ. संभाजीनगरच्या घाटीला का नाही?
By संतोष हिरेमठ | Updated: December 1, 2025 19:30 IST2025-12-01T19:30:27+5:302025-12-01T19:30:27+5:30
मराठवाड्यातील रुग्णांच्या ’आधारवड’कडे सरकारचे दुर्लक्ष

स्वायत्तेसाठी नागपूर मेडिकल,‘जेजे’,‘ससून’चा विचार, मग छ. संभाजीनगरच्या घाटीला का नाही?
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ‘नागपूर मेडिकल’, मुंबईतील ‘जेजे’ आणि पुण्यातील ‘ससून’ या ३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे रूपांतर स्वायत्त संस्थेत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सचिवांना पत्र देऊन अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. मात्र, मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचे आधारवड असलेल्या ७० वर्षे जुन्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) स्वायत्त दर्जा देण्यास सरकार का दुर्लक्ष करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घाटी रुग्णालयाची वाटचाल पंचाहत्तरीकडे सुरू आहे. घाटीचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) डीएम ऑन्को पॅथाॅलॉजी, डीएम मेडिकल ऑन्कॉलॉजी, एमसीएच हेड-नेक सर्जरी, एमसीएच गायनालॉजिकल ऑन्कॉलॉजी, डीएम पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, एमसीएच सर्जिकल ऑन्कॉलॉजी, असे ६ सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू आहेत. सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये ‘सुपर स्पेशालिटी’ उपचार मिळत असून, तब्बल ९ अतिविशेषोपचार शाखांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असताना स्वायत्त दर्जा देताना घाटीचा विचार का केला जात नाही, असा सवाल आहे.
घाटीसाठीही प्रयत्न करू
नागपूर मेडिकल, जेजे आणि ससून यांना स्वायत्त दर्जा देण्यासंदर्भात आजच माहिती मिळाली. घाटी रुग्णालयालाही स्वायत्त दर्जा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जाईल.
- अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री
पायाभूत सुविधा वाढतील
राज्यातील नागपूर, मुंबई आणि पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबरोबर घाटी रुग्णालयालाही स्वायत्त दर्जा मिळाल्यास येथील पायाभूत सोयीसुविधा वाढीस मदत होईल. यंत्रसामग्री वाढीस मदत होईल.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता
घाटीचे नाव नसणे, हे चकित करणारे
७० वर्षांत दर्जेदार डॉक्टर घडवणाऱ्या आणि रुग्णांची सेवा करणाऱ्या घाटीचा स्वायत्त संस्थांच्या यादीत नाव नसणे आश्चर्यचकित करणारे आहे. घाटीला संलग्न असणारे शासकीय कर्करोग रुग्णालय, स्वायत्ततेमुळे कर्करोग रुग्णांना फायदा होईल.
-डॉ. कृष्णा पांचोले, माजी विद्यार्थी
स्वायत्त दर्जा आवश्यक
महाराष्ट्रातील प्रमुख जुन्या आणि महत्त्वाच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये घाटीचे नाव आहे. याबरोबरच तब्बल १८-२० जिल्ह्यांतील रुग्णांना सेवा देण्यासाठी घाटीचा नावलौकिक आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशाकीय अशा सर्वांगीण सेवांमध्ये उत्तम कामगिरी करण्याऱ्या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळावा.
-डॉ. शारंगधर कदम, माजी विद्यार्थी
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना पत्र
घाटी रुग्णालयाला स्वायत्त दर्जा देण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले आहे. संस्थेला स्वायत्त दर्जा प्रदान केल्यास निर्णय प्रक्रियेला गती, आधुनिक वैद्यकीय सेवा उभारणीला बळ संशोधन व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी सेवा व्यवस्थापनातील कार्यक्षमता या बाबतीत मोठा लाभ होईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटू.
- खा. डॉ. भागवत कराड