२८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 02:20 PM2024-02-05T14:20:14+5:302024-02-05T14:23:19+5:30

गावाबाहेर १९९५ मध्ये जिल्हा परिषदेची दोन खोल्यांची शाळा इमारत बांधलेली आहे

For 28 years, Fazalwadi Zilla Parishad School did not get electricity; The computer is in the dust | २८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून

२८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून

- रऊफ शेख 
फुलंब्री :
तालुक्यातील फाजलवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेत मागील २८ वर्षांपासून आजपावेतो वीजपुरवठा पोहोचलेला नाही. शाळेत पिण्याचे पाणी नाही, विजेअभावी संगणक धूळखात पडून आहेत. विद्यार्थ्यांना बसण्याची नीटनेटकी व्यवस्था नसल्याचे विदारक चित्र येथे बघायला मिळाले.

तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले फाजलवाडी गाव मारसावळी ग्रामपंचायतमध्ये येते. येथील लोकसंख्या दीड हजार असून, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या या गावातील बहुतांश नागरिक कामाच्या शोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये जातात. गावाबाहेर १९९५ मध्ये जिल्हा परिषदेची दोन खोल्यांची शाळा इमारत बांधलेली आहे; चार महिन्यांपूर्वी येथे आणखी एक वर्गखोली बांधण्यात आली. शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. यात एकूण ७८ मुले, मुली शिक्षण घेतात तर केवळ दोन शिक्षक आहेत. यातील एक शिक्षक सुटीवर गेल्याने एकच शिक्षक कार्यरत आहे. वर्गखोल्या सभोवताली दगड आहेत. शौचालय बांधले; पण पाणी नसल्याने ते बंद आहे. संगणक आहेत; पण त्याला वीजपुरवठा नाही. याबाबत शिक्षकाला विचारणा केली असता आजपावेतो शाळेत वीजपुरवठा आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

गाव दोन तालुक्यांत विभागले
फाजलवाडी गाव फुलंब्री तालुक्यात असले तरी शिक्षण विभागाचा कारभार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून होतो. ग्रामपंचायतचा कारभार फुलंब्री तालुक्यात आहे. अशा या मुस्लिमबहुल गावातील नागरिकांना दोन तालुक्यांत जावे लागते. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील शाळेचा खेळखंडोबा झाला असून, या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

संगणक आले, वीज नाही
मारसावळी व फाजलवाडी या दोन ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. ग्रामपंचायतीने वीजपुरवठा असलेल्या शाळेत संगणक देण्याऐवजी जेथे वीजपुरवठा नाही, अशा शाळेत संगणक दिला. संगणक व वीजपुरवठ्यासाठी लाखाचा खर्च दाखविला. ही हास्यास्पद बाब आहे, असे गणेश गाडेकर यांनी सांगितले.

Web Title: For 28 years, Fazalwadi Zilla Parishad School did not get electricity; The computer is in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.