food poisoning: भगरीतून विषबाधा प्रकरणी १० किराणा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 19:58 IST2022-09-28T19:57:23+5:302022-09-28T19:58:39+5:30
food poisoning: शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल झाले आहेत

food poisoning: भगरीतून विषबाधा प्रकरणी १० किराणा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल
वैजापूर - भगरीतून नागरीकांना विषबाधा झालेल्या प्रकरणात दहा किराणा दुकानदारांविरोधात पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी शहर व ग्रामीण भागात भगर खाल्ल्याने विषबाधा होऊन अनेक नागरीकांना त्रास जाणवला होता. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल झाले होते. उपजिल्हा रुग्णालयातील ४४ रुग्णांवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यानंतर आज भगरीमुळे विषबाधा झालेले पाच रुग्ण दाखल झाले. सध्या उपजिल्हा रुग्णालयात ११ विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय अनेक रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेले. तर काहीवर अद्याप उपचार सुरू आहेत. वैजापूर पोलीस ठाण्यात जवळपास १०० रुग्णांची नोंद झाली. या नोंदीच्या आधारे पोलिसांनी तपासणी केली.
याप्रकरणी पोलीस नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील आठ व ग्रामीण भागातील दोन अशा एकूण दहा किराणा दुकानदारांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात कलम २७३ व ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानदारांनी विकलेली भगर ही खाण्यास अपायकारक असल्याचे माहीत असताना विक्री केली. त्यामुळे रुग्णांना वेदना होऊन रोग होण्यास कारणीभूत ठरले. शांतीलाल पोपटलाल संचेती, सबका मालीक एक, रविंद्र किराणा, रमेश गोरख त्रिभुवन, बाळू मुगदिया, जय बाबाजी, नविन भाजी मंडईतील हिरेन, देवकर किराणा, भुसारी घायगाव, वजीर भाई यांचे रिहान किराणा लोणी बुद्रुक या किराणा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे हे करीत आहेत.