छत्रपती संभाजीनगरकरांच्या डोक्यावरून जातात बँकाॅक, हाँगकाँग, शारजाची विमाने!
By संतोष हिरेमठ | Updated: December 4, 2025 14:25 IST2025-12-04T14:20:03+5:302025-12-04T14:25:01+5:30
‘आकाश ग्लोबल, पण धावपट्टीवरून लोकलच’ ! आणखी किती दिवस या परदेशी विमानांना जमिनीवरूनच ‘टाटा’ करावे लागले, ही विमाने प्रत्यक्ष शहरातील धावपट्टीवर कधी उतरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांच्या डोक्यावरून जातात बँकाॅक, हाँगकाँग, शारजाची विमाने!
छत्रपती संभाजीनगर : ‘तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण शहरवासीयांच्या, जिल्हावासीयांच्या डोक्यावरून म्हणजे उंच आकाशातून दररोज बँकाॅक, हाँगकाँग, शारजा यांसह विविध देशांची विमाने ये-जा करतात’. छत्रपती संभाजीनगरहून आंतरराष्ट्रीय विमानसेवेची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. आणखी किती दिवस या परदेशी विमानांना जमिनीवरूनच ‘टाटा’ करावे लागले, ही विमाने प्रत्यक्ष शहरातील धावपट्टीवर कधी उतरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहराच्या आकाशातून आंतरराष्ट्रीय विमानांची मुंबईकडे सततची ये-जा सुरू असताना, छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अद्याप एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू झालेले नाही. विमानतळाच्या नावातच फक्त आंतरराष्ट्रीय वापरता येते. पण प्रत्यक्षात शहरातील धावपट्टी ‘फक्त देशांतर्गत’ सेवेतच अडकली आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने २०१४-१५ मध्ये चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे हे देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले; परंतु विमानतळाला पूर्ण इमिग्रेशन दर्जा मिळण्यासाठी परराष्ट्र व गृहखात्याकडून दर्जा मिळणे बाकी आहे. इमिग्रेशन चेक पोस्ट (आयसीपी) मंजुरी मिळाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा?
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या आकाशातून बँकाॅक (थायलंड), शारजा ( संयुक्त अरब अमिरात), मस्कत (ओमान), हाँगकाँग (चीन), ग्वांगचोउ (चीन), मनिला (फिलिपाईन्स), ढाका (बांग्लादेश) यांसह विविध आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होते.
२०२४ मध्ये दर्शविली तयारी, पण...
एअर एशिया एअरलाइन्सने २०२४ मध्ये बँकाॅक विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. २०२४ अखेर ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’अभावी २०२५ मध्येही ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकली नाही.
सोयी-सुविधा सज्ज
विमानतळावर इमिग्रेशन चेक पोस्टची प्रतीक्षा आहे. त्यास मंजुरी मिळताच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतील. आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने विमानतळावर बोर्डिंग व चेकइन काउंटरसह विविध सुविधा सज्ज आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसह येथील विमानसेवा वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.
- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ